
अमराठी व्यापाऱ्यांविरोधात ठाकरेंची तोफ धडाडणार; वातावरण तापणार…
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ थेट मीरा भाईंदरमध्ये धडाडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा रंगली होती. दरम्यान, आज राज ठाकरे या विषयावर काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
मीरा-भाईंदरमध्ये काही अमराठी व्यापाऱ्यांनी मराठी आणि मनसेचा विरोध केला होता. त्यानंतर ते रस्त्यावर उतरले होते. या विरोधाला उत्तर देण्यासाठी मनसेनं मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं होतं. मराठी नागरिकही या लढ्यात सहभागी झाले होते. यावेळी मराठी माणसाची गर्जना ऐकायला मिळाली. दरम्यान, आज राज ठाकरे मराठी जनतेला संबोधित करून डरकाळी फोडणार आहेत.
मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे आज काय बोलणार?
मीरा भाईंदर अमराठी व्यापाऱ्यांची मुजोरी पाहायला मिळाली. मराठी बोलणार नाही, अशी गरळ ओकणाऱ्या प्रवृत्ती विरोधात मनसेनं व्यापक मोहिम हाती घेत जबरदस्त दणका दिला होता. यानंतर ते रस्त्यावर उतरले. मिळालेल्या माहितीनुसार, या आंदोलनाला भाजपकडून अप्रत्यक्ष पाठींबा मिळाल्याचं बोललं जात आहे.
यानंतर मराठी माणूस पेटला. मनसे आणि मराठी माणसाने मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्याचं ठरवलं. मात्र, पोलिसांनी मोर्चेच्या मार्गाला विरोध केला. पण आंदोलक मागे हटले नाही. संतापलेल्या मराठी नागरिकांनी त्याच मार्गावरून मोर्चा काढणार असल्याचं ठरवलं. त्यांनी मोर्चाची मोहिम फत्ते केली. यानंतर मोर्चाला विरोध करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
या मोर्चावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते. त्यांनी मोर्चात सहभागी होण्याचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांनी त्यांना विरोध केला. ‘५० खोके एकदम ओके’ असं म्हणत त्यांच्यावर बाटली भिरकावली. यामुळे त्यांनी १० मिनीटात मोर्चास्थळावरून काढता पाय घेतला.
या सगळ्या घटनेनंतर राज ठाकरे आज मीरा भाईंदरमध्ये सभा घेणार आहेत. मराठी विजय मेळाव्यानंतर त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम असणार आहे. त्यांनी याबाबत पोस्ट देखील शेअर केली आहे. दरम्यान, या कार्यक्रमात ते जनतेला काय संबोधित करणार आहेत, हे पाहणं म्हत्वाचं ठरणार आहे.