
‘स्थानिक’च्या निवडणुकांसाठी सपकाळांनी टाकला मोठा डाव; तब्बल 280 जणांची टीम अन्…
1. काँग्रेसचा पराभव आणि नव्याने वाटचाल: विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्रात संघटनात्मक बदल केले असून, नव्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करत आहे.
2. 280 जणांची जम्बो कार्यकारिणी: प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 280 सदस्यांची नविन कार्यकारिणी तयार केली असून त्यात सामाजिक आरक्षणाचे काटेकोर पालन केले आहे.
3. बुथ लेव्हलवर भर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने बूथस्तरावर नियुक्ती आणि रणनीतीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
2. गेली चार पाच दशकं महाराष्ट्राचं राजकारण कोळून प्यायलेले दिग्गज नेत्यांची फौज सोबत असतानाही काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळाचा आकडाही गाठता आला नाही. हा पराभव दिल्लीतील काँग्रेसच्या हायकमांडच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्याचमुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपला मेगा प्लॅन निश्चित केला आहे.
काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वानं विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचाच चेहरा बदलताना, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारख्या चौकटीबाहेरचा आणि नव्या दमाच्या नेत्याकडे ही मोठी जबाबदारी सोपवली. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठे पाऊल उचलले आहेत.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठी रणनीती आखली आहे. त्यांनी यापूर्वीच पक्षाच्या बैठका,मेळावे, गाठीभेटी यांच्यासह अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता.
याचदरम्यान,सपकाळ यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणीत 280 जणांची नवी जम्बो टीम दिसणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 280 जणांच्या नावांची यादी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीला पाठवल्याचीही माहिती आहे.
त्यामुळे काँग्रेसनं येत्या काही महिन्यांत होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीसमोर तगडं आव्हान उभं करणार असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसनं याचदरम्यान मोठी खेळी खेळताना नव्या प्रदेश कार्यकारिणीत तब्बल 40 टक्के जागा या ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवल्या आहेत.
हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसनं आपल्या नव्या जम्बो कार्यकारिणीत अनुसुचित जाती आणि जमातींसाठी 16 ते 17 टक्के तर अल्पसंख्याकांसाठी 18 ते 19 टक्के राखीव ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याचवेळी त्यांनी खुल्या प्रवर्गासाठी 25 ते 28 टक्के जागा आणि महिलांसाठी 15 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वानं आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षबांधणीसाठी मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. या जम्बो कार्यकारिणीमुळे काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याची चर्चा अंदाज होत आहे. पण सपकाळांच्या या निर्णयाचा पक्षाला ‘स्थानिक’च्या निवडणुकीत कितपत फायदा होतो, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसने भाजपच्या पावलावर पावले ठेवत बूथ लेव्हलपासून नियुक्ती करण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून त्याचे परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे बूथरचनेवर भर देण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. गेल्या काही दिवसापासूनच काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. या सर्व यंत्रणेवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसकडून आता सावधपणे पावले उचलली जात आहेत. आगामी काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्याची तयारी आतापासूनच केली जात आहे. ही निवडणूक काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वबळावर लढणार याची उत्सुकता लागली आहे.
1. काँग्रेसने महाराष्ट्रात नव्या कार्यकारिणीत किती सदस्यांची नियुक्ती केली आहे?
काँग्रेसने 280 सदस्यांची जम्बो कार्यकारिणी तयार केली आहे.
2. या नव्या कार्यकारिणीत ओबीसी समाजासाठी किती टक्के जागा राखीव आहेत?
ओबीसी समाजासाठी 40% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
3. काँग्रेसने आगामी निवडणुकीत कोणत्या स्तरावर भर दिला आहे?
काँग्रेसने बूथ स्तरावर नियुक्ती व बांधणीवर विशेष भर दिला आहे.
4. काँग्रेस महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार का?
हे अजून स्पष्ट नाही, पण चर्चा सुरू आहे की काँग्रेस स्वबळावर की आघाडीसोबत निवडणूक लढणार.