
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानभवनातील वादग्रस्त वर्तनाच्या निषेधार्थ छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविनय निवेदन पाठवण्यात आले आहे. यामध्ये कोकाटे यांचा मंत्रिपदावरून तात्काळ राजीनामा घेऊन त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन पैठण तहसीलदार मार्फत पाठवण्यात आले असून त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, पावसाळी अधिवेशन सुरू असताना कृषीमंत्री कोकाटे हे ऑनलाईन ‘रम्मी’ हा जुगाराचा खेळ मोबाईलवर खेळताना आढळून आले. संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून, हा प्रकार अत्यंत निंदनीय व लोकशाहीचा अपमान करणारा असल्याचे छावा सेनेचे म्हणणे आहे.
“जर मंत्र्यांना विधानभवनात जुगार खेळण्यास परवानगी असेल, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांनाही ‘रम्मी क्लब’ चालविण्यासाठी अधिकृत परवाने मिळावेत,” अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शासनाने यावर तात्काळ कारवाई न केल्यास छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यामध्ये देण्यात आला आहे. यावेळी छावा महाराष्ट्र सेनेचे संघटना प्रमुख किशोर पाटील शिरवत, प्रदेश सल्लागार किशोर सदावर्ते, जिल्हाप्रमुख साईनाथ कर्डिले, युवक जिल्हाप्रमुख किरण काळे पाटील, तालुका प्रमुख अर्जुन खराद, संजय मरकड, महेश शिरवत आदींची उपस्थिती होती.