
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
डहाणू, २९ जुलै २०२५,श्रावण महिन्यात भक्तीभावाचे वातावरण गडद होत असताना नागपंचमीच्या निमित्ताने डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. डहाणू व पालघर तालुक्यातील तसेच गुजरात राज्यातील अनेक भाविक या दिवशी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.सकाळपासूनच गड चढण्यासाठी भाविकांची रांग लागलेली दिसून आली. पारंपरिक वेशात, डोक्यावर फुले, नारळ आणि प्रसाद घेऊन अनेक भक्तांनी गड चढून देवीचे दर्शन घेतले. महालक्ष्मी गड मंदिर ट्रस्ट तसेच स्थानिक सामाजिक संस्थांच्या वतीने भक्तांसाठी भंडाराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा दर्शनानंतर भाविकांनी लाभ घेतला.या दिवशी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून आला. तरुणाईचा उत्साह आणि वृद्धांचे श्रद्धाभाव यांचा संगम गडावर पाहायला मिळाला.पावसामुळे गडावरील पायवाट काहीशी ओलसर व घसरडी झाल्याने गड चढणं थोडं अवघड झालं, तरीदेखील भाविकांचा उत्साह कुठेही कमी झालेला दिसला नाही. काही ठिकाणी अपघात होऊ नयेत म्हणून स्थानिकांनी प्रशासनाकडून खबरदारी घेण्याची मागणी केली.
नागपंचमीच्या दिवशी आई महालक्ष्मी मातेच्या गडावर आजूबाजूच्या गावांतून तरुण-तरुणी मोठ्या संख्येने मातेच्या दर्शनासाठी येतात. उत्साह, श्रद्धा आणि परंपरेचा संगम या पर्वात दिसतो. विशेषतः युवकांचा सहभाग पाहता ही परंपरा पुढील पिढीकडे सुसंस्कारितपणे जात आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. अशा धार्मिक आणि सांस्कृतिक एकत्रीकरणामुळे सामाजिक ऐक्य आणि मूल्यांची जपणूक होते.
अरविंद बेंडगा – भाविक
नागपंचमीसारख्या धार्मिक सणांमुळे आमच्या व्यवसायालाही चालना मिळते. अशा प्रसंगी गडावर भक्तांची गर्दी झाल्याने परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण होते.
किशोरी बोलाडा- स्थानिक दुकानदार