
विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आला आहे.
माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषिमंत्री असणार आहेत.
गेल्या काही दिवासांपासून विरोधकांनी माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. माणिकराव कोकाटेंच्या विधानावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र माणिकराव कोकाटेंबाबत देवेंद्र फडणवीसांना श्रेय मिळू नये म्हणून अजित पवारांनी स्वत:च त्यांची उचलबांगडी केली. तसेच धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी परस्पर घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं ती चूक टाळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कोकाटेंचा खातेपालट करत अजित पवारांनी कारवाई केल्याचं दाखवलं-
खातेपालटावर विरोधी पक्ष टीका करत असले तरी अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. क्रीडा आणि युवक खातं मिळाल्याने अजितदादांचे विश्वासू असलेलेल दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती. दत्तात्रय भरणेंनी खातेवाटपानंतर ही नाराजी उघडही केली होती. मात्र आता कोकाटेंवरील कारवाई ही दत्तात्रय भरणेंसाठी एक लॉटरी ठरलीय. कृषिखात्यासारख्या खात्यावरील वर्णी ही दत्तात्रय भरणेंसाठी लॉटरीच मानली जातेय. एकीकडे माणिकराव कोकाटेंचा खातेपालट करत अजित पवारांनी कारवाई केल्याचं दाखवलंय. तर दुसरीकडे विश्वासू दत्तामामा भरणेंना कृषिखातं देत त्यांच्या नाराजीवरही अक्सीर इलाज केल्याचं बोललं जात आहे.
कोण आहेत दत्तात्रय भरणे?
मंत्री दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू नेते मानले जातात. ते इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दत्तात्रय भरणे यांना पहिल्यांदा मंत्रिपद देण्यात आलं होतं. महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा दत्तात्रय भरणे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं होतं. आता माणिकराव कोकाटे यांच्या विधानपरिषदेतील पत्ते खेळण्यामुळं आणि शेतकऱ्यांसदर्भातील वक्तव्यांमुळं त्यांच्याकडील कृषीखातं काढून घेत दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे.