
अर्धवट वकील; छमछम’चा परवाना रिटर्न करताच रामदास कदम ठाकरेंच्या शिलेदारावर बरसले…
शिवसेना (उद्धव गट) नेते अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर वाळू चोरी व डान्स बार चालवण्याचे आरोप केले.
कदम यांनी सावली बारचा परवाना परत केला, त्यानंतर रामदास कदम यांनी परबांवर टीका केली.
कोकणात शिवसेना-शिंदे गट व उद्धव गट यांच्यातील संघर्षाने राजकीय वातावरण तापलं आहे.
राज्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना घेरण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांनी केले होते. कदम यांच्यावर वाळू चोरीसह डान्स बार चालविण्याचा आरोप परब यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता. तसेच कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर नुकताच त्यांनी कदम यांच्याविरोधातील पुरावेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. यानंतर कदम यांच्यावर मुख्यमंत्री कोणती कारवाई करतात याकडे राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान कदम यांनी सावली बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना परत केला. यावरूनही परब यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार टीका करताना परब यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी परब यांना पुन्हा डिवचताना अर्धवट वकील’, ‘तू राजीनामा मागणारा कोण? असा सवाल केला आहे. यामुळे कोकणातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
रामदास कदम यांनी परवाना रद्द करण्याच्या मुद्द्यावरून अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. सावली बारच्या बाबतीत अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करत असून ते अर्धवट वकील असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच योगेश कदम यांचा राजीनामा मागणारा तू कोण? असा सवाल ऍग्रिमेंट दाखवत कदम यांनी केला.
यावेळी कदम यांनी खुलासा करताना, शरद शेट्टींना सावली बार चालवायला दिला होता. त्यावेळी ऍग्रिमेंट केलं होते. त्या ऍग्रिमेंटच्या कॉलम 6 मध्ये स्पष्ट केलं आहे की, बारमध्ये कोणताही बेकायदेशीर धंदा चालवणार नाही. तर येथे हॉटेल धंदा होईल. अटींचं भंग होणार नाही. तसेच कॉलम 7 मध्ये, काही कृत्य झाल्यास धंदा चालवणारे जबाबदार असतील. त्यास मालकाची जबाबदारी असणार नाही.
आता या बारमध्ये काही गोष्टी आढळून आल्यानंतर आम्ही तात्काळ शरद शेट्टींशी ऍग्रिमेंट तोडलं आहे. त्याला बाहेर काढल आहे. तसेच दोन्ही लायसन्सही संबंधित विभागाकडे तेव्हाच जमा केले आहेत. मात्र हे प्रकरण परब यांनी अधिवेशनात 18 तारखेला उपस्थित केला असा दावा देखील कदम यांनी केला आहे.
त्यामुळे या प्रकरणाशी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे त्यांचा राजीनाम्याचा विषयच येत नाही. पण परब हे दिशाभूल करत असून नियमबाह्य पद्धतीने त्यांनी विधानमंडळात हा विषय काढला. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप तात्काळ काढून टाकावेत अशी मागणी करणारा अर्ज सभापतींना दिलेला असल्याचेही कदम यांनी सांगितले आहे.