
प्रांजल खेवलकरांचा पाय आणखी खोलात; अडचणी वाढणार…
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पुण्यात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे, ते सध्या जेलमध्ये आहेत.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले होते, मानवी तस्करीच्या अनुषंगाने खराडी प्रकरणाची चौकशी व्हावी, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.
दरम्यान आता या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे, या प्रकरणात महिला आयोग अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. महिला आयोगाकडून पोलीस महासंचालकांना पत्र पाठवण्यात आलं आहे. हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी, महिला आयोगाकडून पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे.
मानवी तस्करीच्या अनुषंगाने खराडी प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी व्हावी असे पत्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालक यांना दिले आहे. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ आणि फोटो आढळले होते. त्यामुळे हा सगळा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं. आता याच प्रकरणी त्यांनी थेट पोलीस महासंचालकाला पत्र देत सखोल चौकशी करुन महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल आणि ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हायला हवी, असं म्हटलं आहे.
महिलांना कशा प्रकारे आणले गेले, फसवणूक, दबाव टाकून या महिलांना पार्टीसाठी बोलवण्यात आलं होतं का? याची पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंध पथकाकडून (AHTU) चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. त्यासोबतच महिला अधिकाऱ्यांचा समावेश आलेली एसआयटी स्थापन करून, सखोल चौकशी आणि योग्य कारवाई करावी अशी मागणी देखील या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी केली आहे.