
CM फडणवीसांनी झाप-झापलं अन् पोलिसांना बोलावून बाहेर काढलं…
एका मंत्री महोदयांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यामुळे मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्यापूर्वीच वातावरण तापले होते. सर्व अधिकाऱ्यांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्यानंतरही हा अधिकारी तिथेच बसून राहिला.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पारा चांगलाच चढला होता. स्वतः फडणवीस यांनीच पोलिसांना पाचारण करत या विशेष कार्य अधिकाऱ्याला बाहेर घालविले. कॅबिनेट बैठकीतील सर्व मंत्री आणि सचिव हा प्रसंग आश्चर्यचकीत नजरेनं पाहत होते.
मंत्रिमंडळ बैठकीबाबत गोपनीयता रहावी असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अट्टाहास आहे. इथे निर्णय होण्यापूर्वी ते माध्यमांमध्ये येऊ नयेत, बैठकीत होणाऱ्या चर्चा आधीच बाहेर जाऊन नयेत असे फडणवीस यांचे सर्वच मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश आहेत. तसेच बैठकीत एखाद्या विषयावरून होणारी खडाजंगीही बाहेर जाऊ देऊ नका अशी तंबीच त्यांनी दिली आहे. तरीही काही मंत्री आणि अधिकारी माध्यमांना कागदपत्रे देत असल्याचे निदर्शनास येताच पूर्ण बैठक डिजीटल करण्यात आली. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून मंत्र्यांना टॅब दिले.
आता मंत्रिमंडळ बैठकीला केवळ मंत्री आणि सचिव दर्जाचे अधिकारी यांनाच बैठकीमध्ये प्रवेश देण्यात येतो. मंगळवारीही बैठकीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांच्या स्वीय सहायक, खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी यांना नेहमीप्रमाणे बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. त्यावर विभागांचे सचिव वगळता सर्व अन्य अधिकारी सभागृहातून बाहेर गेले. पण शिवसेनेच्या एका मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तसेच बैठकीत बसून राहिले. फडणवीस यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांचा पारा चढला.
मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्याला ‘आपण का बसला आहात?’ अशी विचारणा केली, त्यावर संबंधित विशेष कार्य अधिकाऱ्याने त्याच्या मंत्र्यांचे नाव सांगितले. आपल्याला मंत्री महोदयांनीच थांबण्यास सांगितले असल्याची कल्पना दिली. त्यावर आपला राग आवरत देवेंद्र फडणवीस यांनी तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना बोलावून संबंधित अधिकाऱ्याला बाहेर घालवले. कॅबिनेट बैठकीतील सर्व मंत्री आणि सचिव हा प्रसंग आश्चर्यचकीत नजरेनं पाहत होते. यावेळी बाहेर थांबलेल्या अन्य अधिकाऱ्यांना मात्र काय झाले, हे कळू शकले नाही.