
एखादं पद मिळाल्यावर…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून त्यांचे अत्यंत विश्वासू दत्तात्रय भरणे यांना पूर्ण ताकद दिली जात असून त्यांना आता कृषिमंत्री पदही देण्यात आलं आहे.
त्याचमुळे पाटील यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी बुधवारी (ता.13 ऑगस्ट) इंदापुरात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. याच बैठकीत पुढच्या आठ दिवसांत किंवा महिन्याभरात मला एखादं पद मिळालं तर तालुक्यातील सोडून गेलेला जो 10 टक्के वर्ग आहे, तो पटापट माघारी फिरेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी काल काय झालं याचा विचार कधीच केला नाही, उद्या काय करायचं ते पाहू असंही वक्तव्य केलं. ते म्हणाले, कार्यकर्त्यांचं आणि माझं नातं काही कुठल्या पदापुरतं निश्चितच नाही. एक दहा टक्के वर्ग असा आहे जो सोडून गेला. पुढच्या आठ दिवसात, महिन्याभरात मला जर पद मिळालं तर ते पटापटा आपल्याकडे येतील असा दावा पाटील यांनी केला.
हीच परत आलेली मंडळी मग निष्ठावंताना बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात. पण अशी लोकं कधी माझ्याकडे परत येतात, याचीच मीही आता वाटच बघतोय. मला पण राजकारणात चाळीस वर्षे झाली आहेत. परिस्थिती बदलते, चिंता कधीच करायची नसते असा विचारही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवला.
मागच्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. त्यांचा हा सलग तिसरा पराभव होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उडी घेतली होती.
पण आता हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. पाटील हे वारंवार भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. इंदापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदरातिथ्य केले होते, तर आज त्यांनी महसूल मंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. या त्यांच्या वाढलेल्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठीनंतर ते लवकरच शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना ते भाजपमध्ये असताना राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपद दिले होते. परंतु महायुतीत इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाणार असल्याचं निश्चित होताच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात चुरशीची तिरंगी लढत पाहायला मिळाली. यात हर्षवर्धन पाटलांना पराभवाला सामोरे जावे लागले.