
‘ग्रामिण बँके’चे संस्थापक आणि नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सत्ता हातात घेताना जनतेला विकासाची, रोजगाराची आणि पारदर्शक सत्तेची स्वप्ने दाखवली होती.
मात्र त्यांच्या कारभाराला आज एक वर्ष पूर्ण होत असताना, ह्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे वास्तव समोर आले आहे. आर्थिक अडचणींनी त्रस्त उद्योगधंदे एकामागोमाग एक बंद पडत आहेत, आणि सुमारे १.१९ लाखांहून अधिक कामगार बेरोजगार झाले आहेत.
गेल्या एका वर्षातच ३५३ कारखाने कायमचे बंद पडले आहेत. सावर, गाजीपूर, चितगाव, नारायणगंज आणि नरसिंगडीसारख्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये निर्माण झालेल्या या अडचणींनी हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. विशेषत: रेडीमेड कपडे, निटवेअर आणि कापड उद्योग – जे शेख हसीना यांच्या काळात सुवर्णयुग अनुभवत होते आता अस्तित्वासाठी झगडत आहेत.
कारखाने बंद होण्याची कारणे स्पष्ट
कारखाना तपासणी विभाग आणि औद्योगिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँक कर्जावरील अवाजवी व्याजदर, कच्च्या मालाच्या आयातीतील एलसी (Letter of Credit) समस्या, गॅस व वीजटंचाई, गॅसदरात सतत होणारी वाढ, तसेच कामगारांच्या वेतनवाढीमुळे वाढलेला उत्पादन खर्च या साऱ्यामुळे उद्योगधंद्यांची स्पर्धात्मकता पूर्णपणे कमी झाली आहे. त्यातच कामगारांचा असंतोष वाढल्याने उत्पादनात अडथळे येऊ लागले, आणि अखेर मालकांना कारखाने बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
बेरोजगारीचा भस्मासुर
अनेक कारखान्यांचे दरवाजे कायमचे बंद झाल्याने, हजारो कामगार रोजीरोटीच्या शोधात शहरातून गावाकडे परतत आहेत. हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकजण वेगवेगळ्या शहरांत नोकरीच्या शोधात भटकंती करत होते, मात्र सततचे अपयश आणि वाढते आर्थिक ओझे यामुळे त्यांचा आत्मविश्वास खचला आहे.
युनूस यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळाचा पहिला वर्धापनदिन हा त्यांच्यासाठी आत्मपरीक्षणाचा क्षण ठरायला हवा होता. पण त्याऐवजी, विरोधक त्यांच्यावर अपयशाचा ठपका ठेवत आहेत. केवळ आर्थिक संकटच नव्हे, तर कायदा-सुव्यवस्था देखील ढासळत चालल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून होत आहे.
नवीन पंतप्रधानांच्या प्रतीक्षेत बांगलादेश
सत्तेच्या वर्षपूर्तीनिमित्त युनूस यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या सत्तेतील हेतूंवर शंका घेतली असून, पुढील काही महिने बांगलादेशासाठी राजकीयदृष्ट्या अतिशय निर्णायक ठरणार आहेत.
भारताशी संबंध आणि आर्थिक घसरण
राजकीय विश्लेषकांच्या मते, युनूस यांच्या भारताशी असलेल्या तणावपूर्ण संबंधांनी देखील बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम केला आहे. व्यापारातील अस्थिरता, परकीय गुंतवणुकीतील घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील विश्वासाचा तुटवडा यामुळे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.
आज बांगलादेशात एकच प्रश्न घुमतो आहे “सत्ता बदलून नेमके काय मिळाले?”
जनतेच्या अपेक्षा आणि वास्तव यातील प्रचंड दरी, बेरोजगारीचा वाढता दर आणि ढासळलेली उद्योगव्यवस्था यामुळे पुढील निवडणुका युनूस यांच्यासाठी अत्यंत कठीण ठरणार आहेत.