
पुणे पुन्हा हादरलं !
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून, कायदा व सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नुकतीच दौंड तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली ज्यामुळे शहरात एकच खळबळ उडालीये.
आईच्या अनैतिक संबंधातून मुलाने एका व्यक्तीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील दौंड तालुक्यातील इंदिरानगर परिसरात विशाल उर्फ नळ्या किसन थोरात याने गुरुवारी रात्री (14 ऑगस्ट) प्रवीण दत्तात्रय पवार या व्यक्तीवर कोयत्याने वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात प्रवीण पवार या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नितीन अशोक गुप्ते या भाजीविक्रेत्याने दौंड पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं व त्याची चौकशी सुरु केली. चौकशीत पोलिसांना धक्कादायक कारण समोर आलं. आईचे प्रवीण पवार याच्यासोबत अनैतिक संबंध होते. आणि याच रागातून गुरुवारी रात्री घराबाहेर पडल्यानंतर संतापाच्या भरात प्रवीण पवार याच्यावर कोयत्याने वार केल्याचं विशाल उर्फ नळ्या किसन याने कबूल केले. नळ्या किसन याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात प्रवीण पवार याच्या डोक्यावर तसेच तोंडावर व हातावर गंभीर जखमा होत्या. ज्यात तो वाचू शकला नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तापासाला वेग दिला असून, पुढील कारवाई सुरु केली आहे.