
निवडणूक आयुक्तांवर संजय राऊत भडकले !
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींच्या मतदारयाद्यांवरील आरोपांवर पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिल्यानंतर या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
त्यांनी राहुल गांधींनी शपथपत्र सादर किंवा देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. यावर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया देत निवडणूक आयुक्तांवर मग्रुरीचा आरोप केला. राऊत म्हणाले की, संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून असा अहंकार अपेक्षित नाही.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल करत म्हटलं की, भाजपच्या लोकांकडून जसा अहंकार असतो तसाच निवडणूक आयुक्तांनी दाखवला आहे. “तुम्ही शपथपत्र राहुल गांधींकडे मागत आहात? तर या देशातील 80 कोटी जनता शपथपत्र देण्यासाठी तयार आहे,” असे राऊतांनी स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले की, ज्ञानेश कुमार ज्या पक्षाची भलामण करत आहेत त्या भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनीही मतदारयादींमध्ये घोळ झाल्याचे आरोप केले होते.
राऊतांनी विचारले की, अनुराग ठाकूर यांनी विशिष्ट मतदारसंघांमधील लाखो मतांची चोरी झाल्याचा उल्लेख केला, तर मग निवडणूक आयुक्तांनी त्यांच्याकडून शपथपत्र का मागितलं नाही? निवडणूक आयोग पुढील कारवाई अनुराग ठाकूर यांच्यावर का करत नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती असल्याचा आरोप करून राऊतांनी सरकारवर आणि आयोगावर कडाडून निशाणा साधला.