
आपत्ती व्यवस्थापन तज्ञ संजय केतकर यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथकाला आले यश
प्रतिनिधी नागेश पवार
ठाणे,दि.22(जिमाका):- गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अशा परिस्थितीत ठाणे, मुंब्रा, दिवा आणि शिळफाटा भागांत अनेक ठिकाणी पाणी साचले होते, ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. या कठीण काळात प्रशासनावर कामाचा प्रचंड ताण होता. मात्र, अशा वेळी सिद्धाचल को.ऑप हौसिंग सोसायटीज फेडरेशन लिमिटेड (अपेक्स बॉडी), ठाणे येथील रहिवासी आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ञ संजय केतकर यांच्या नेतृत्वाखालील एका छोट्या बचाव पथकाने देवदूतासारखी मदत करून अनेक कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले.
या बचाव पथकात आपत्ती व्यवस्थापन तज्ञ संजय केतकर यांच्यासोबत सिद्धाचल कॉम्प्लेक्समधील रहिवासी योगेश चव्हाण, वसंत विहार रुग्णालयाच्या प्रतिनिधी साक्षी गुप्ता आणि सुरक्षा रक्षक शिवपूजन यादव यांचा समावेश होता. हे सर्वजण गेल्या काही वर्षांपासून केतकर यांच्याकडून आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.
अशी घडली घटना
दि.20 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 च्या सुमारास टीडीआरएफ (TDRF) चे कमांडो सचिन दुबे यांनी संजय केतकर यांना संपर्क साधून दिवा येथील दातिवली, गोपाळधाम अपार्टमेंट आणि शिळफाटा, शिबली नगर भागात अनेक कुटुंबे अडकून पडल्याची माहिती दिली. या भागात सुमारे तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले होते. दुबे यांनी या भागात मदतकार्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे सांगितले. त्यानंतर लगेचच केतकर यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली.
संजय केतकर, जे स्वतः 64 वर्षांचे असूनही, “ही तुमची पहिली मोठी बचाव मोहीम आहे,” असे म्हणत टीमचे नेतृत्व करण्यासाठी पुढे सरसावले. या पथकाने घटनास्थळी पोहोचल्यावर पाहिले की, परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता आणि तळमजल्यावरील घरे पूर्णपणे पाण्याखाली होती. पाण्याची पातळी हळूहळू खाली येत असली तरी अनेक लोक अडकले होते.
या बचाव पथकाने अडकलेल्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यांनी पाणी साचलेल्या भागातून मार्ग काढत नागरिकांना बाहेर येण्यास मदत केली. स्थानिक नागरिकांना त्यांनी एकत्र येऊन पुढाकार घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतल्यास मोठी मदत
ही संपूर्ण बचाव मोहीम यशस्वी झाल्यानंतर संजय केतकर यांनी सांगितले की, प्रशासन आपल्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असते, पण आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी प्रशिक्षण घेतल्यास आणि प्रशासनाला सहकार्य केल्यास मोठी मदत होऊ शकते. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, जास्तीत जास्त लोकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घ्यावे आणि नागरी संरक्षण दलाचे सदस्य व्हावे.
या टीमने दाखवलेले हे धाडस आणि मदतकार्य पाहून स्थानिक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. सुमारे 4 ते 5 तासांच्या या बचावकार्यानंतर ही टीम सिद्धाचल येथे परतली. शासनासोबत नागरिकांनी केलेल्या या मदतीचा हा अनुभव इतरांसाठी निश्चितच एक प्रेरणा आहे.
(टीप: अतिवृष्टीमुळे बचाव कार्यादरम्यान फोटो काढणे शक्य नसल्याने प्रत्यक्ष बचावकार्याचे फोटो उपलब्ध नाहीत. परंतु टीडीआरएफ व आपदा मित्रांना प्रशिक्षण देतानाचे फोटो बातमीसोबत जोडले आहेत.)