
भारतासाठी सुद्धा चांगले संकेत…
सध्या जगात टॅरिफ वॉर सुरु आहे. याला जबाबदार आहेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. त्यांनी जगातील अनेक देशांवर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावला आहे. त्यामुळे अमेरिकेत तर महागाई वाढणारच आहे.
पण सोबतच अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांना सुद्धा याचा फटका बसतोय. यात भारत सुद्धा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, सध्या 25 टक्के टॅरिफ वसूल केला जात आहे. पुढच्या काही दिवसात रशियाकडून तेल खरेदी करतो, म्हणून अजून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ आकारला जाईल. या टॅरिफ वॉर दरम्यान आता एक थोडी चांगली दिलासा देणारी बातमी आहे. म्हणा हा, दिलासा अमेरिकेला मिळणार आहे. पण यातून भविष्यासाठी थोडे चांगले संकेत आहेत.
कॅनडा येत्या 1 सप्टेंबरपासून बऱ्याच अमेरिकी वस्तुंवरील टॅरिफ हटवणार आहे. अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून कॅनडाने हा टॅरिफ लावला होता. पण स्टील, एल्युमीनियम आणि ऑटोमोबाइल वस्तुंवरील टॅरिफ तसाच राहिलं. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली. त्यानंतर कार्नी यांनी प्रत्युत्तर म्हणून लावलेला टॅरिफ हटवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दोन्ही देशातील ट्रेड टेन्शन कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
USMCA काय आहे?
ही घोषणा USMCA (अमेरिका-मॅक्सिको-कॅनडा एग्रीमेंट) करारा अंतर्गत करण्यात आली आहे. USMCA अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रोडक्ट्सना सूट देण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. USMCA 1 जुलै 2020 रोजी लागू झालेला. उत्तर अमेरिका मुक्त व्यापार कराराच्या जागी (NAFTA) USMCA सुरु झालेला. या करारामागे अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडामधील आर्थिक संबंध मजबूत करणं आणि व्यापार संतुलन साधणं हा उद्देश होता.
टायमिंग महत्वाचा
कॅनडाने हा निर्णय घेण्यामागचा टायमिंगही खूप महत्वाचा आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये एका व्यापक ट्रेड डीलवर चर्चा सुरु असताना कॅनडाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेने ऑगस्ट महिन्यात कॅनडावर 35 टक्के टॅरिफ लावला होता. प्रत्युत्तर म्हणून कॅनडाने सुद्धा अमेरिकी सामानावर 25 टक्के टॅरिफ लावला. “आता अमेरिकी सामानावरील टॅरिफ मागे घेण्याच्या निर्णयामुळे वॉशिंग्टनसोबत व्यापार चर्चेला गती येईल” असं कार्नी म्हणाले.
ट्रम्प काय म्हणाले?
“सध्या कॅनडाचा अमेरिकेसोबत चांगला व्यापार करार आहे. अन्य कुठल्याही देशापेक्षा हा करार चांगला आहे” असं कार्नी म्हणाले. “कार्नी यांच्यासोबत सार्थक चर्चा झाली. आम्हाला कॅनडासोबत चांगला व्यवहार करायचा आहे” असं ट्रम्प म्हणाले. ‘मला कार्नी आवडतात. मला वाटत ते एक चांगले व्यक्ती आहेत’ अशा शब्दात ट्रम्प यांनी त्यांचं कौतुक केलं.
भारतासाठी चांगले संकेत काय?
टॅरिफ हटवण्याचा हा निर्णय कॅनडाचे अन्य राजकीय नेते आणि युनियन नेत्यांना पटलेला नाही. त्यांनी कार्नी यांच्यावर टीका केली. कॅनडाने घेतलेला हा निर्णय भारतासाठी चांगला संकेत यासाठी आहे, कारण भविष्यात भारत-अमेरिकेमध्ये सुद्धा चर्चा होऊन 50 टक्के टॅरिफच्या वादात तोडगा निघू शकतो.