
जिवाभावाचे मित्र एकमेकांच्या विरोधात का उभे राहिले…
ओबीसी आरक्षण आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ते माळी समाजाबद्दल भाष्य करताना दिसत आहेत. “ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे, हे त्यांच्या पोटात दुखत आहे
भुजबळांची दोन पोर काही कामाची नाहीत. बाकी कुठला नेता भुजबळांनी वर येऊ दिला नाही,” असे ते म्हणताना दिसत आहेत. या व्हिडीओनंतर ओबीसी समाजातूनच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनीही या व्हिडीओनंतर लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच ते खुलासा करतील असे सांगितले. यावर खुलासा करताना हाके म्हणाले, हा व्हिडीओ माझाच आहे. पण त्यातील आवाज माझा नाही, असेही त्यांनी सांगितले. याच व्हिडीओनंतर हाके यांच्याविरोधात त्यांचाच जिवाभावाचा मित्र विरोधात उभा राहिला आहे. हाकेंसोबत फिरताना आपला अनेकदा अवमान झाला. पण कधी बोलून दाखवले नाही. आता हाकेंनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे मित्रांची जोडी
गतवर्षी मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यास लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे या मित्रांच्या जोडीने कडाडून विरोध केला होता. दोघांनी वडीगोद्री गावात उपोषण केले होते. या आंदोलनामुळेच लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे दोन्ही नेते राज्यभरात चर्चेत आले होते. जवळपास 10 दिवस त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची मागणी करत उपोषण केले होते. पण गेल्या काही दिवसापासून या दोन नेत्यांमध्ये वितुष्ट आले आहे. हे दोन्ही नेते एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुढील काही दिवसात मुंबईत मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. अशात हाके हेही ओबीसी आरक्षण वाढविण्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता होती. पण त्यापूर्वीच या व्हिडीओमुळे दोन्ही नेत्यांमधील छुपे वाद जाहीरपणे समोर आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये मतभेद वाढले आहेत. हे आता जाहीरपणे समोर आले आहेत. काही जणांना वाटते की हा राजकीय हस्तक्षेप किंवा बाहेरून टाकलेला दबाव यामुळेच ही फूट पडली आहे.
ओबीसींच्या एकतेला तडा जाण्याची भीती :
लक्ष्मण हाके यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेली टीका, त्यातून वाघमारे यांनी हाके यांच्यावर घेतलेले तोंडसुख यामुळे ओबीसी समाजाच्या एकतेला तडा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “एकत्र असल्यास मोठा दबाव निर्माण झाला होतो, पण एकतेला तडा गेल्यास ओबीसी समाजाचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे ओबीसी समाजाचा विचार करून एकत्रित राहणे गरजेचे आहे, अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे. आता हाकेचा गेम कोणी केला? उत्तर वेळच देईल, पण इतके मात्र नक्की की ओबीसी समाजाची ताकद या तिन्ही नेत्यांच्या एकतेवर अवलंबून आहे.