
रोहित पवार अडचणीत ?
विधान परिषदेत मोबाईल रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले होते. रमी प्रकरणामुळे त्यांना आपले कृषिमंत्रिपद गमवावे लागले.
त्यांचे खाते बदलून क्रिडा व युवक कल्याण हा विभाग त्यांना देण्यात आला आहे. आता कोकाटेंनी मोठं पाऊल उचलले आहे.
माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना थेट मानहानीची नोटीस पाठविली आहे. रोहित पवार यांनीच सोशल मीडियातून ही माहिती दिली. त्यांनी ही नोटीसही पोस्ट केली आहे. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल, असे पवारांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी पोस्टमध्ये कोकाटेंच्या नोटिसीची खिल्ली उडवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात.
मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे, नोटीस वाचून हसू आवरता आले नाही. पण लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी वकिलांमार्फत पाठविलेल्या नोटिसीमध्ये रोहित पवार यांच्या 22 जुलैच्या सोशल मीडियातील पोस्टवर आक्षेप घेण्यात आला आहे. या पोस्टमध्ये बदनामी झाल्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे. तसेच नोटीस प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत अधिकृत सोशल मीडिया हँडल आणि वृत्तपत्रांतून जाहीर माफी मागावी, अन्यथा कोर्टात दावा दाखल करण्याचा इशारा कोकाटे यांनी रोहित पवारांना दिला आहे.