
जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि १४६ गणांची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तहसील, पंचायत समिती, तसेच जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकांवर ही प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत गट आणि गणांमध्ये घट झाल्याने आरक्षण देखील नव्याने करावे लागणार आहे.
यासंदर्भातील अंतिम निर्णय ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग लवकरच घेणार आहेत.जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि पंचायत समितीच्या १४६ गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा १४ जुलै रोजी जिल्हा प्रशासनने प्रसिद्ध केला. त्यावर मुदतीत एकूण २१७ हरकती नोंदवण्यात आल्या.
त्यानंतर हा अहवाल विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सादर केल्यानंतर हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यात आली. विभागीय आयुक्तांनी सुचविलेले बदल तपासल्यानंतर प्रभाग रचनेला मान्यता दिली. त्यानुसार ही अंतिम रचना आज प्रसिद्ध करण्यात आली.
प्रत्येक गट व गणाच्या लोकसंख्येनुसार आरक्षण ठरणार आहे. याबाबत निर्णय मात्र ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग घेणार आहे. अंतिम आरक्षण आल्यानंतर सोडत पद्धतीने ते लागू करण्यात येईल. मात्र, त्यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.