
किल्ले विशाळगडावरील हिंसाचाराला 13 महिने उलटल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शाहुवाडी पोलिस पथकाने हिंसाचारातील मुख्य सूत्रधार समजला जाणारा रवी पडवळ याला मंगळवारी (ता.26) मध्यरात्री अटक केली आहे. कोल्हापूर पोलिसांना हडपसर येथील एका घरात तो असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पहाटे अडीचच्या सुमारास संशयित रवी पडवळ याला अटक करण्यात आली. 13 जुलै ते 14 जुलै या दरम्यान किल्ले विशाळगड येथे हिंसाचार घडला होता.
14 जुलै रोजी किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात झालेल्या मोर्चा वेळी हिंसाचार घडला होता. यावेळी गड पायथ्याला असणाऱ्या मुसलमानवाडी येथील रहिवाशांच्या घरावर काही समाजकंटकांनी हल्ला केला होता. हल्ल्यात प्रापंचिक साहित्यासह घरांची मोडतोड, जाळपोळ, वाहनांचे नुकसान यासह धार्मिक स्थळावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला होता. प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात रवी पडवळ यांच्यासह जवळपास 450 तरुणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दरम्यान यातील काही तरुणांना अटक करून न्यायालयीन कोठडी देखील देण्यात आली होती. त्यातील 14 जणांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मात्र संशयित मुख्य सूत्रधार समजला जाणारा रवी पडवळ हा पोलिसांना गुंगारा देत पसार झाला होता. अखेर आज मध्यरात्री पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे रवी पडवळ असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
13 महिन्यांनी पोलिसांचे डोळे उघडले
विशाळगडचा हिंसाचार झाल्यानंतर महिनाभरातच रवी पडवळ हा सोशल मीडियातून रोज ऑनलाईन आणि लाईव्ह येत असे. अनेक मुद्द्यांवर तो विचार व्यक्त करत होता. तर त्याच्याच गो शाळेत तो काम करत असे. याची संपूर्ण माहिती तो आपल्या सोशल मीडियातून इतरांना देत होता. एरवी सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या कोल्हापूर पोलिसांना एखादा साधा गुन्हेगार तत्काळ सापडतो. मात्र रवी पडवळ हा 13 महिने पसार असताना देखील पोलिसांनी कारवाईसाठी टाळाटाळ केली. मात्र 13 महिन्यानंतर पोलिसांचे डोळे उघडले आहेत.