
मध्य प्रदेशातील भिंड येथे खतांच्या संकटावरून आक्रमक शेतकरी रस्त्यावर रोष व्यक्त करत होते. पण या निदर्शनादरम्यान जे घडले त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भिंड येथील भाजप आमदार नरेंद्र सिंह कुशवाह यांनी शेतकऱ्यांच्या समस्येवरून जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव यांच्या बंगल्याबाहेर धरणे आंदोलन केले.
हे प्रकरण इतके वाढले की आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्यात जोरदार वाद झाला. यादरम्यान आमदारांनी केवळ जिल्हाधिकाऱ्यांना शिवीगाळ केली नाही तर त्यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्नही केला, त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांना हस्तक्षेप करावा लागला.
जिल्ह्यातील वाढत्या खत संकटामुळे हा संपूर्ण वाद झाला. शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांना रात्री उशिरापासून खतासाठी सहकारी संस्थांबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत, तरीही त्यांना फक्त एक किंवा दोन पोती खत मिळत आहे. शेतकऱ्यांचे असेही म्हणणे आहे की खुल्या बाजारात तेच खत सहज चढ्या दराने विकले जात आहे, त्यामुळे काळाबाजार होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने संतप्त शेतकरी आमदारांसह जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी आले होते.
‘औकातमध्ये राहा’ आणि कानाखाली मारण्याची धमकी
जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव त्यांच्या बंगल्याच्या गेटवर आंदोलकांशी बोलण्यासाठी आले तेव्हा आमदार नरेंद्र सिंह कुशवाहा त्यांना शिवीगाळ करू लागले. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्याकडे बोट दाखवत म्हटले, ‘तुमच्या मर्यादेत बोला.’ हे ऐकून आमदारांचा राग वाढला आणि त्यांनी मुठी आवळून जिल्हाधिकाऱ्यांना दाखवली. जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू चोरी होऊ दिली जाणार नाही असे सांगितले तेव्हा आमदारांनी ‘तू सर्वात मोठा चोर आहेस’ असे प्रत्युत्तर दिले. वाद इतका तापला की आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना कानाखाली मारण्यासाठी हात वर केला, परंतु सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.