
20 दिवसांत तब्बल 60 टक्क्यांची अफलातून वाढ; अंजली दमानिया यांनी उपस्थित केला सवाल…
सोन्याची खाण हाती लागली का? — ज्या कंपनीच्या शेयर ची किंमत जुलै 2024 पर्यंत, ₹42 होती त्या कंपनीत असे काय झाले की त्या कंपनीच्या शेअर्स ची किंमत एका वर्षात ₹701 झाली? सोन्याची खाण सापडली का?
ही जादूची कंपनी Cian Agro आहे आणि त्या कंपनीच्या मालकांच्या बाबांच्या हातात सत्ता आहे म्हणून त्यांनी इथेनॉल वापरायला आपल्याला भाग पाडले आणि मुलाच्या कंपनी ला भरमसाठ प्रॉफिट, असेही दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाच्या इथेनॉल निर्मिती कंपनीच्या शेअरचा भाव 20 दिवसांत तब्बल 60 टक्क्यांनी वाढल्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निखील गडकरींची कंपनी इथेनॉल निर्मिती करते. त्यामुळेच त्याचे बाबा (नितीन गडकरी) आपल्या डोक्यावर E20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल ठोकत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर हा पर्यावरणपूरक आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इथेनॉल हे उसासारख्या पिकांपासून तयार केले जाते, ते पेट्रोलमध्ये मिसळल्याने जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी होते आणि कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात घट होते. पर्यायाने हवेची गुणवत्ता सुधारून हरितगृह वायूंचे प्रमाण कमी होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात, इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यामुळे केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे.
निखील गडकरींचे बाबा म्हणत…
अंजली दमानिया गुरूवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाल्या की, Cian Agro ह्या कंपनीचा भाव 5 ऑगस्टला ₹398 होता, तो आज 28 ऑगस्ट ला ₹701 कसा झाला? 20 दिवसात 60% वाढ? इतकी अफलातून वाढ कशी झाली? ही कंपनी निखिल गडकरी ह्यांची आहे. त्याचे नाव पूर्वी Umred Agro ह्या नावाने होती. ही कंपनी इथेनॉल निर्मिती करते आणि म्हणून ह्या निखिल गडकरींचे बाबा, आपल्या डोक्यावर E20 म्हणजे, 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल ठोकत आहेत.
जितके इथेनॉल मिश्रित पेट्रोल आपण वापरू, आपल्या गाड्यांचे एवरेज कमी होणार व मेंटेनेंस चा खर्च वाढणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे अंजली दमानिया यांनी यापूर्वी अनेकदा नितीन गडकरी व त्यांच्या पूर्ती उद्योग समुहावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी त्यांच्यात मोठा वाद रंगला होता.