
दैनिक चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :’लोहा तालुक्यातील कलंबर (बु) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २६ ऑगस्ट डॉ.अनुपस्थित असल्याने एका शेतकऱ्याचा जीव गेला. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
शेतकरी मारुती लक्ष्मण सपूरे (रा. कलंबर बु.) यांनी २६ ऑगस्ट रोजी कर्जाला कंटाळून विष प्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी कलंबर बू.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथे एकही डॉक्टर हजर नसल्याने तातडीने नांदेडच्या शासकीय रुग्णालयाकडे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला
उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत संतप्त गावक-यांनी दि.२७ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावून आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तिव्र नाराजी व्यक्त केली. ही बातमी समजताच कलंबर सर्कलचे माजी जि.प.सदस्य बालाजी परदेशी कलंबर गणाचे पंचायत समितीचे सदस्य तथा लोहा पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी दवाखाण्यास भेट दिली यावेळी गावकरी व गायकवाड यांनी लोहा – कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना सर्व हकीकत भ्रमणध्वनीवरून सांगीतली . यावर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जि.परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व तालूका आरोग्य अधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क साधून कलंबर बू. येथील आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी कुलूप काढले. दरम्यान, अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी व गावक-यांनी केली आहे. सदर घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून दवाखान्याचा दर्जा सुरधाणेची गरज आहे आसे सूत्राकडून माहिती मिळाली आहे.