
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी येत्या 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात मोठं आंदोलन छेडणार आहे. या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनासाठी लाखोंच्या संख्येनं राज्यभरातील मराठा बांधव मुंबईकडे निघाले असून यामुळे फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढली आहे. याचदरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यातील महायुती सरकार अडचणीत आले असतानाच दुसरीकडे केंद्रीय मंत्री असलेल्या रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी गुरुवारी (ता.28) मोठा निर्णय जाहीर केला आहे.
महाबळेश्वर येथे आरपीआयचं राज्यस्तरीय विचारमंथन शिबिर बोलावण्यात आलं होतं.याच शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबतचा ठराव आरपीआय आठवले गटाकडून एकमतानं मंजूर करण्यात आला.
आठवले म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की, सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, अशी आमची भूमिका असल्याचंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केली आहे. याचवेळी मनोज जरांगे यांनी मोलाचा सल्ला देतानाच जरांगेंनी एखादी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत घ्यावी असं म्हटलं. जरांगेंनी फडणवीसांवरील टीका टाळावी असंही मत व्यक्त केलं.
राज्यात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचदरम्यान,आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आरपीआय पक्षबांधणीत लक्ष घातल्याचं दिसून येत आहे.
इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी आरपीआयला महायुती सरकारमध्ये जास्तीत जास्त महामंडळ आणि मंत्रिपदे मिळावीत अशी मागणीही केली होती. आता त्यांनी महायुती सरकारमध्ये आरपीआयचा समावेश करण्यात यावा अशी डिमांडही त्यांनी थेट पंतप्रधान मोदींकडे केली होती.
मंत्री रामदास आठवले यांनी महाबळेश्वर येथील आरपीआयच्या शिबिरात राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. तसेच, महायुतीमधून पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आरपीआय पक्षाला महामंडळ आणि मंत्रिपदे मिळतील, असा ठरावही घेण्यात आला.
महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पंतप्रधानांसोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आठवलेंनी सोशल मीडियावरुन दिली होती. यात त्यांनी एक मुद्दा हा महायुतीबाबत नाराजीचाही होता.
याबाबत मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं, आम्ही महायुतीचे जुने आणि विश्वासू घटक आहोत. महाराष्ट्रातील आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी स्थापनेपासूनच प्रत्येक आघाड्यांवर कठोर परिश्रम केले आहेत. महाराष्ट्रातील सरकारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा समावेश करण्याची मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडल्याचंही त्यात आठवलेंनी म्हटलं होतं.
रामदास आठवले केवळ मंत्रिपद नाही, तर सत्तेत कोणतीही महत्त्वाची भूमिका देखील आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मिळालेली नसल्याची खंत मोदींसमोर बोलून दाखवली होती. तसेच खरं तर आम्हाला महाराष्ट्रात मंत्रिपद अपेक्षित होतं, मात्र ते भाजपानं आम्हाला दिलं नाही. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापूर्वीही सविस्तर चर्चा केल्याचंही मोदींना सांगितलं होतं.