
डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार सल्लागाराची मुक्ताफळं; लोकशाहीवरूनही दिला सल्ला !
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लागू केलेले अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आणि आधीचे २५ टक्के असे एकून ५० टक्के टॅरिफ लागू झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टॅरिफबाबत भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र, भारताने रशियाकडून तेलखरेदी बंद केल्याशिवाय टॅरिफ मागे घेणार नाही, अशी आडमुठी भूमिका अमेरिकेने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भारतानंही अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ मागे घेतल्याशिवाय व्यापारविषयक चर्चा होणार नाही असं सांगितलेलं असताना आता ट्रम्प यांच्या व्यापारविषयक सल्लागारांनी भारताची हेटाळणी करणारं विधान केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापरविषयक सल्लागार पीटर नवारो यांनी एका अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये नवारो यांना भारतावरील टॅरिफ आणि रशिा-युक्रेन युद्ध याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली.
‘हे मोदी युद्ध’
युक्रेन व रशिया यांच्यात चालू असलेल्या युद्धाला नवारो यांनी ‘मोदी युद्ध’ असं म्हणत भारतावर टीका करण्याचा प्रयत्न केला. ‘अमेरिकेतील करदात्यांचा पैसा बुडतोय कारण आपल्याला या ‘मोदी युद्धा’चा भुर्दंड बसतो आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिकेचे युक्रेनमधील शांततेचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. दोन्ही देशांमधील शांततेचा मार्ग काही प्रमाणाच का होईना, नवी दिल्लीतूनच जातो’, असं नवारो म्हणाले.
तेलखरेदीतून रशियाची भरमसाठ कमाई
दरम्यान, भारत व चीन रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतात आणि यातून मिळालेला पैसा रशिया युक्रेन युद्धासाठीच्या युद्धसामग्रीत खर्च करत आहे, असा दावा पीटर नवारो यांनी केला आहे. ‘खरं हे आहे की तुम्हाला भारत आणि चीनला रशियाकडून तेलखरेदी करण्यापासून रोखावं लागेल. जर रशियाकडून इतर देशांनी तेलखरेदी बंद केली, तर युक्रेन युद्धासाठी रशियाकडे पैसाच उरणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची यात भूमिका महत्त्वाची ठरणार आहे’, असं पीटर नवारोंनी नमूद केलं.
रशियाकडून दिवसाला जवळपास १५ लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. इतक्या पैशातून युक्रेनच्या सैनिकांना मारण्यासाठी असंख्य ड्रोन आणि बॉम्ब घेता येऊ शकतात’, असंही नवारो म्हणाले.
भारतीय खूप उद्धट आहेत – पीटर नवारो
दरम्यान, पीटर नवारो यांनी या मुलाखतीत भारतीयांचा ‘उद्धट’ म्हणून उल्लेख केला. ‘माझा सगळ्यात जास्त आक्षेप यावर आहे की भारतीय खूप उद्धट आहेत. त्यांचा दावा असतो की त्यांच्याकडून जास्त टॅरिफ आकारले जात नाही, ते म्हणतात की ते सार्वभौम आहेत, कुणाकडूनही तेल खरेदी करू शकतात. पण तुम्ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहात. त्याप्रमाणे वागा’, अशी मुक्ताफळं नवारो यांनी उधळली आहेत.
तुम्ही हुकूमशाही वृत्तीच्या राष्ट्रांशी जवळीक करत आहात. तुम्ही चीनला पूरेपूर ओळखून आहात. अनेक वर्षांपासून तुमचं चीनशी शीतयुद्ध चालू आहे. त्यांनी तुमच्या अक्साई चीन आणि इतर भागांमध्ये घुसखोरीही केली आहे. ते तुमचे मित्र नाहीत’, असंही नवारो भारताला उद्देशून म्हणाले.
ट्रम्प यांच्या आर्थिक सल्लागारांचा भारताला इशारा
दरम्यान, नवारो यांच्याप्रमाणेच डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार केविन हॅसेट यांनीही भारताला इशारा दिला आहे. “जर भारताने माघार घेतली नाही तर मला वाटत नाही की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांची टॅरिफबाबतची भूमिका बदलतील,” असे केविन हॅसेट म्हणाले आहेत. शिवाय, “भारतासोबतच्या व्यापार वाटाघाटी गुंतागुंतीच्या होत्या. भारत आमच्या उत्पादनांसाठी त्यांची बाजारपेठ न उघडण्याबाबत हट्टीपणा करत आहे. भारतावरील टॅरिफ भारत केवळ रशियन तेल खरेदी करत असल्यामुळे नाही तर चालू व्यापार कराराच्या चर्चेच्या प्रदीर्घ स्वरूपामुळे देखील आहेत. मला वाटले होते की मे किंवा जूनमध्ये अमेरिका-भारत करार होईल. अमेरिकेशी व्यापार करार करणाऱ्यांमध्ये भारत पहिल्या काही दैशांपैकी असेल, परंतु त्यांनी एकप्रकारे आम्हाला झुलवत ठेवले, असं हॅसेट म्हणाले.