
दैनिक चालू वार्ता – शिरूर प्रतिनिधी-इंद्रभान ओव्हाळ
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी (साबळेवाडी) येथे शुक्रवारी (दि.५) सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. विजेच्या करंटमुळे बापलेकाचा विहीरीत मृत्यू झाल्याने गावभर हळहळ व्यक्त होत असून, या घटनेने प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत.
या हृदयद्रावक घटनेत सुदाम सुभाष गाढवे (वय ४३) आणि त्यांचा लाडका मुलगा भारत सुदाम गाढवे (वय १७) यांचा मृत्यू झाला.
सकाळी नेहमीप्रमाणे सुदाम गाढवे विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने त्यांचा मुलगा भारत त्यांना शोधत विहिरीकडे गेला. वडिलांना पाण्यात पडलेले पाहून मुलगा जीवाच्या आकांताने मित्राला हाक देत स्वतःच विहिरीत उडी मारली. मात्र पाण्यात उतरलेल्या करंटने त्यालाही जबर धक्का दिला… आणि क्षणभरात बापलेकाने प्राण गमावले.
भारतचा मित्र आरडाओरडा करत गावकऱ्यांना घेऊन आला. ग्रामस्थांनी तातडीने वीजप्रवाह बंद करून विहिरीतून दोघांना बाहेर काढले. दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
सुदाम गाढवे हे वारकरी संप्रदायात भक्तीमय कार्यात अग्रेसर होते. दरवर्षी देहूपासून पंढरपूर वारीत टाकळीकर प्रासादिक दिंडीसोबत सहभागी होत असत. भजनी मालिकेतील त्यांचे ज्ञान लक्षणीय होते. मुलगा भारत हा बापूसाहेब गावडे विद्यालयात अकरावीला शिकत होता. लहान वयातच तो हुशार, शांत व सर्वांचा लाडका होता.
गाढवे कुटुंब नगर जिल्ह्यातील नांदूर पठारचे मूळ रहिवासी असून टाकळी हाजी येथे स्थायिक झाले होते. दूध व्यवसाय उभारून त्यांनी कुटुंबाची संसारवाहिनी सुरू ठेवली होती. त्यांच्या घरी दहा-पंधरा जर्सी गाई असून रोज शंभर लिटर दूध डेअरीत जात असे.
आज अचानक आलेल्या या दुर्दैवी घटनेने गाढवे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. बापलेकाचा अकाली मृत्यू हा फक्त त्यांच्या घरासाठीच नव्हे तर संपूर्ण गावासाठी काळीज पिळवटून टाकणारा आहे. गावातील प्रत्येक घरातून रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत. आईसमोर एकाचवेळी नवऱ्याचा आणि लेकराचा मृतदेह पाहण्याची वेळ आली… अश्रूंना आसवे सापडेनाशी झाली.
संपूर्ण टाकळी हाजी गाव शोककळेत बुडाले असून गाढवे कुटुंबावर दुःखाचा काळोख पसरला आहे.