
लाखे पाटलांनी समोर येऊन काय सांगितलं?
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचा लढा चालू आहे. नुकतेच त्यांनी मुंबईत जाऊन आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण केले. त्याच्या परिणामस्वरुप राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी केली आहे.
सरकारच्या या शासन निर्णयाचा मराठवाड्यातील अनेक मराठा समाजाच्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. दरम्यान, राज्यभरात जरांगे यांची वाहवा होत असताना आता मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे आता राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
जरांगे समस्त मराठा समाजाचे नुकसान करत आहेत
डॉ. संजय लाखे यांनी जालना शहरात असताना जरांगे यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. जरांगे मराठा समाजाला एकटं पाडण्याचं काम करत आहेत. जरांगे समस्त मराठा समाजाचे नुकसान करत आहेत, असा आरोप लाखे यांनी केलाय. मनोज जरांगे स्वतःचे मत वाढवण्यासाठीच आंदोलन करतात. मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे. मनोज जरांगे पाटलांचा असा समज असा आहे की मी हा एकटाच जगन्नाथाचा रथ ओढतो. जरांगे समस्त मराठा समाजाचे नुकसान करत आहेत. जरांगे मराठा समाजाचं नाही तर कुणबी समाजाचं नेतृत्व करत आहेत. जरांगेंची एकही मागणी वैध कायदेशीर, घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या पद्धतीची नाही, असा घणाघाती आरोप लाखे यांनी केला.
जरांगे स्वतःची बुवाबाजी चालवत आहेत
जरांगे यांमना कायदा आणि शासन आदेश, पुराव्याचा शासन आदेश, यातला फरकच कळत नाही. हैदराबाद गॅझेटचा त्यांना अभ्यास नाही. समाजाने जरांगेंवर केवळ फुलांवर 100 कोटी रुपये उधळले. मनोज जरांगे आंदोलनातून स्वतःची बुवाबाजी चालवत आहेत. त्यांना स्वतःच्या पुढून कॅमेरा जायला नको असे वाटते. चुकीच्या पद्धतीने आंदोलन चालवून ते मराठा समाजाचे नुकसान करत आहेत. मनोज जरांगे हे मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना टार्गेट करण्याचं काम सूत्रबद्ध पद्धतीने करतात. मुंबईतील आंदोलनादरम्यान शासनाने दिलेला ड्राफ्ट मनोज जरंगे यांना अगोदरच माहीत होता. केवळ ड्राफ्ट वाचून सरकारचा जयजयकार करून गुलाल उधळला गेला, अशीही टीका यावेळी लाखे यांनी जरांगे यांच्यावर केली.
मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचा डाव
मनोज जरांगे यांना शासनाने दिलेल्या ड्राफ्ट अगोदरच माहीत होता केवळ सरकारचा जयजयकार करण्यासाठी त्यांनी गुलाल उधळला असल्याचा आरोप लाखे पाटील यांनी केलाय, मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना सूत्रबद्ध पद्धतीने मनोज जरांगे टार्गेट करत असून , मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचा देशभरातील आरएसएसचा अजेंडा ते राबवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय.
जरांगे RSS च्या अजेंड्याप्रमाणे…
जरांगेंचे आंदोलन उभे राहिलेले नाही. मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांना मजबूत करण्यासाठी इतर समाजातील नेते कार्यकर्ते यांना नाहक वैयक्तिकरित्या लक्ष्य करत आहेत. RSS च्या देशभरातील अजेंडा प्रमाणे मनोज जरांगे मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचं काम करत आहेत, असा गंभीर आरोप लाखे यांनी केला आहे. तसेच जरांगे मराठा समाजाला एकटं पाडत आहेत. जरांगे यांची एकही मागणी घटनात्मक कायदेशीर किंवा वैध नाही. हैदराबाद गॅझेट कसे लागू होऊ शकते याबाबत त्याचा अभ्यास बालवाडी यत्ता एव्हढाच आहे, असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता या टीकेवर जरांगे नेमकं काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.