
महत्वाची सेवा ठप्प; ट्रम्प चिंतेत…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर कर लादून खळबळ उडवून दिली होती. भारतावरही 50 टक्के कर लादण्यात आला होता. मात्र अमेरिकेच्या या टॅरिफचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवांना बसला आहे.
युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) ने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेला जाणारी टपाल वाहतूक 80 टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम अमेरिकन नागरिकांवर होताना दिसत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जगभरातील 88 देशांमधील टपाल ऑपरेटर्सनी आपल्या सेवा काही काळासाठी किंवा कायमच्या स्थगित केल्या आहेत. सुरुवातील अमेरिकेने लहान वस्तूंवर सूट दिली होती. मात्र 29 ऑगस्टपासून सर्व टपाल सेवांवर कर लावण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय टपाल सेवा विस्कळीत झाली आहे.
अमेरिकन सरकारच्या या निर्णयामुळे जर्मनीची ड्यूश पोस्ट, ब्रिटनची रॉयल मेल आणि बोस्निया आणि हर्जेगोव्हिनासह अनेक देशांच्या टपाल सेवांनी अमेरिकेला जाणारे पार्सल घेणे बंद केले आहे. भारत, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली आणि जपानसारख्या देशांनीही अमेरिकेला पार्सल पाठवण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
टपाल वाहतूक 81 टक्क्यांनी घटली
UPU ने दिलेल्या आकडेवारीनुसार 29 ऑगस्टच्या आधी म्हणजे एका आठवड्यापूर्वीच्या तुलनेत अमेरिकेला जाणारी टपाल वाहतूक आता 81 टक्क्यांनी कमी झाली. 88 देशांमधील टपाल ऑपरेटर्सनी UPU ला सांगितले आहे की, टॅरिफच्या निर्णयावर तोडगा निघेपर्यंत अमेरिकेला जाणारी टपाल सेवा आम्ही थांबवली आहे. या 88 देशांच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय व्यापारासह खाजगी ग्राहकांवरही मोठा परिणाम झाला आहे.
UPU कडून उपाय शोधण्याचे काम सुरु
या सर्व प्रकरणावर बोलताना UPU चे महासंचालक मासाहिको मेटोकी यांनी सांगितले की, ‘टपाल सेवा पुन्हा सामान्य करण्यासाठी आम्ही जलद तांत्रिक उपाय शोधत आहोत.’ मात्र सेवा कधी पूर्ववत सुरु होईल याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. UPU ही बर्न (स्वित्झर्लंड) स्थित संस्था आहे, जी 1874 मध्ये स्थापन झाली होती. या संस्थेत 192 देशांचा सहभाग आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय टपाल सेवांसाठी नियम बनवते आणि सदस्य देशांमध्ये सेवा पोहोचवण्याचे काम करते.