
गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) राज्यातील गृहनिर्माण स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुणे, पिंपरी, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मिळून तब्बल 6,168 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे.
या सोडतीत पुणे व पिंपरी महापालिका हद्दीत प्रत्येकी सुमारे 1,500 घरे उपलब्ध होणार असून, पीएमआरडीए क्षेत्रात 1,114 घरे मिळणार आहेत. पुणे म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या सोडतीसाठी अर्ज व अनामत रक्कम स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 11 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.
यावर दावे-हरकती नोंदवण्यासाठी 13 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर अंतिम यादी 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल व 21 नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात येईल. या सोडतीत 1,683 प्रथम प्राधान्य तत्त्वावरील घरे, 299 पंतप्रधान आवास योजनेतील घरे आणि उर्वरित सामाजिक व सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरे उपलब्ध होणार आहेत.
विक्री न झालेली घरेही समाविष्ट
यावेळी घोषित करण्यात आलेल्या सोडतीत गेल्या ऑगस्टमध्ये काढलेल्या सोडतीतील विक्री न झालेली तब्बल 1,300 घरेही समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात पुण्यातील 531, पिंपरीतील 423 आणि पीएमआरडीएतील 250 घरांचा समावेश आहे.
नागरिकांना स्वतःचे घर घेण्याची संधी
या सोडतीमुळे पुणे, पिंपरी, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील हजारो नागरिकांना स्वतःचे घर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः मध्यमवर्गीय व निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना या सोडतीचा मोठा फायदा होणार आहे.
पंतप्रधान आवास योजना व सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतून उपलब्ध होणारी घरे नागरिकांच्या परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहेत. अर्ज प्रक्रियेसाठी ऑनलाईन व डिजिलॉकरचा वापर केल्यामुळे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांना आता सोडतीच्या निकालाची आतुरता लागली आहे. 21 नोव्हेंबर रोजी होणारी सोडत या हजारो कुटुंबांचे गृहनिर्माणाचे स्वप्न पूर्ण करणारे ठरणार आहे.