
चिडलेल्या समर्थकांना शांत करत कदमांचा शब्द…
राज्याच्या मंत्री मंडळात यंदा स्थान न मिळालेले एकनाथ शिंदे यांचे तळ कोकणातील नेते दीपक केसरकर यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दिली आहे. त्यांनी शिवसेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणावर अन्याय करणारे नाहीत, ते करणारही नाहीत. त्यामुळे केसरकर यांना मंत्रीपदापेक्षा मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे स्थानिकच्या तोंडावर शिवसेना केसरकर यांना कोणती जबाबदारी देणार याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचं लक्ष लागले आहे.
जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीता कविटकर, तालुका प्रमुख नारायण राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, दिनेश गावडे, प्रेमानंद देसाई, बंटी पुरोहित, दयानंद कुबल, विद्याधर परब, माजी उपनगराध्यक्ष अनारोजीन लोबो, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सावंतवाडी प्रांताधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते.
कदम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी केसरकर यांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली. या भेटीवेळीच शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी उपनगराध्यक्षा अनारोजीन लोबो यांनी कदम यांच्याकडे मोठी मागणी केली. त्यांनी, शिवसेनेशी प्रामाणिक राहिलेल्या केसरकर यांना मंत्रीपद द्या, त्यांच्यावर अन्याय करू नका, त्यांना प्रवाहात सामावून घ्या, अशी मागणी केली. यावरून जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात केसरकरांना शिंदेंच्या शिवसेनेनं डावललं अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
यावरून मागणी वेळी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केसरकर यांनी समजावून सांगितले. त्यांची समजूत काढत मागणी करण्याची ही जागा नाही, असे सांगितले. तर कदम यांनी, आपण नंतर आढावा घेऊन बैठकीत बोलू, असे सांगितले. यानंतरही लोबो यांचे समाधान झाले नाही. त्यांनी, आमचे भाई साधे असून ते काही मागणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय न करता त्यांना सामावून घ्या, त्यांना मंत्रिपद द्या अशी मागणी लावूनच धरली.
दरम्यान पत्रकार परिषद सुरू असतानाही अशीच मागणी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख कविटकर यांनी केली. त्यांनी आम्हाला काहीतरी बोलायचे असे सांगत, केसरकर यांना मंत्रीपद द्या. ते शिवसेनेशी प्रामाणिक आहेत, त्यामुळे त्यांचा विचार करावा, अशी मागणी केली. यासर्व घडामोडीनंतर कदम यांनी, केसरकरांचा अनुभव मोठा आहे. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना मजबूत करणार आहोत. काहीही झाले तरी आमचे नेते एकनाथ शिंदे कोणावर अन्याय होऊ देणार नाही. केसरक याच्यावर देखील अन्याय होणार नाही. मंत्रीपदापेक्षा मोठी जबाबदारी त्यांना देण्यात येईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला आहे.
तसेच यावेळी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर बाबत स्पष्टीकरण देताना कदम यांनी, जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी आपण दौऱ्यावर आल्याचे सांगितले. जिल्ह्याच्या विकास आणि लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि केसरकर यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्गात शिवसेना अधिक मजबूत झाली आहे. शिवसेना वाढवण्यात केसरकरांचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. तो आदेश पक्षप्रमुख शिंदे देतील त्यानुसार काम करायचे असल्याचेही कदम यांनी म्हटलं आहे.