
ज्येष्ठ भाजप नेत्याची कबुली !
विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या युतीला तोडीस तोडी टक्कर देणाऱ्या माळशिरस भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. ज्येष्ठ नेते के. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक गटाने माजी आमदार राम सातपुते यांच्या कार्यशैलीवर नाराज होत सवतासुभा मांडला आहे. ‘उत्तम जानकरांच्या दाखल्याची अडचण निर्माण होते; म्हणून आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडे पाठपुरावा करून मीच राम सातपुतेंना उमेदवार म्हणून माळशिरसमध्ये आणले. मात्र, सातपुतेंना माळशिरसमध्ये आणणे माझी चूक ठरली, अशी जाहीर कबुली भाजपचे ज्येष्ठ नेते के. के. पाटील यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर एकजूटपणे लढलेल्या भाजपमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती. त्यातच विधानसभा निवडणुकीत काम न केल्याच्या आरोपावरून मतभेद वाढायला सुरूवात झाली होती. काही दिवसांपूर्वी माळशिरसमधील (Malshiras ) जुन्या भाजप नेत्यांनी एकत्रित येत दोन बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर के. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी माळशिरस तालुक्यातील संगम येथे एक बैठक झाली. त्यात बैठकीतच पाटील यांनी आपल्या चुकीची कबुली दिली आहे.
के. के. पाटील म्हणाले, माळशिरस तालुक्यात भाजप वाढत असताना आमचे नेहमीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत अडचणी निर्माण व्हायच्या, त्यामुळे मीच आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडे पाठपुरावा करून हे उमेदवार (राम सातपुते Ram Satpute) आणले. मात्र त्याच वेळी जर जानकर यांना दाखल्याची अडचण आली तरच सातपुते यांनी संधी देण्याचे ठरले. मात्र त्यांना (सातपुते) आणणे ही माझी चूक ठरली.
विधानसभेच्या निवडणुकीत राम सातपुते यांना मिळालेली एक लाख ०८ हजार मते ही तालुक्यातील भाजप आणि समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या कामाची पावती होती. आमच्या पक्षात आधी राष्ट्र, मग पक्ष व त्यानंतर मी हा मंत्र आहे. मात्र आता उलटे वाचावे लागत आहे. त्यांच्या (सातपुते) या वागण्याने तालुक्यात असंतोष निर्माण झाला आहे, असा आरोप के. के. पाटील यांनी केला.
पाटील म्हणाले, राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात चुकीचे वळण लावण्यास सुरुवात केली आहे. पोलिस पाठवणे, गुंड पाठवणे, धमक्या देणे, दोन नंबरवाल्यांना घेऊन फिरणे, हे या तालुक्यात चालणार नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच त्यांनी आता भाजप नेत्यांना आमच्याकडे जाऊ नका म्हणून फोन करणे, मंगल कार्यालयमालकांना फोन करणे, कार्यक्रमात गुंड लोकांना पाठवणे, असे प्रकार केले आहेत. त्यांच्या या वागण्यानेच तालुक्यातील सर्वच पक्षांचे समविचारी कार्यकर्ते एकत्र आले आहेत.
‘सोलापुरात भांडण लावून आले’
लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूरला गेलेले राम सातपुते परत येताना तेथील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये भांडण लावून आल्याचे सांगण्यात आले. ते मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याचे खोटे सांगून भाजपची विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करीत आहेत, असा आरोपही के. के. पाटील यांनी केला.
सातपुते माळशिरस भाजप संपवायला निघालेत
राम सातपुते प्रा. लि. ही कंपनी माळशिरस तालुक्यातील भाजप संपवायला निघाली आहे. या तालुक्यातील ते वाल्मीक कराड होऊ पाहात आहेत, असा आरोप भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेश इंगळे यांनी केला आहे.
बैठकीस भाजपचे राज्य तसेच जिल्हा, तालुका पदाधिकारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, रिपाईं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना शिंदे गट, मनसे, भारतीय दलित महासंघ, प्रहार, रयत शेतकरी संघटना आदी प्रमुख राजकीय संघटनांचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, अतुल सरतापे, पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सूळ, सत्यजित सपकाळ, बाळासाहेब धाईंजे, अजित बोरकर, शहाजी पारसे, दिगंबर मिसाळ, दादा लोखंडे आदी उपस्थित होते.