
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातुन भाजपमध्ये होणारे प्रवेश चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात मित्र पक्षाचे ज्या ठिकाणी आमदार आहेत. त्या ठिकाणी भाजप भविष्यात उमेदवार होऊ शकतील अशा तुल्यबळ नेत्यांना आपल्या पक्षात घेताना पाहायला मिळत आहेत.
त्यामुळे भाजप पुणे जिल्ह्यामध्ये ऑपरेशन लोटस राबवत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याच्या पाहायला मिळत आहे. या अंतर्गतच सर्वप्रथम इंदापूर येथे भाजपने अपक्ष विधानसभा निवडणूक लढलेल्या प्रवीण माने यांना पक्षात प्रवेश दिला असल्याची चर्चा आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री दत्ता भरणे हे माने यांच्या विरोधात निवडणूक लढवून विजयी झाले आहेत.
भोर विधानसभा मतदारसंघात देखील अजित पवार यांचे आमदार शंकर मांडेकर यांनी तत्कालीन काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता. संग्राम थोपटे सध्या भाजपवासी झाले आहेत त्याचप्रमाणे पुरंदर मधील माजी आमदार संजय जगताप देखील भाजपमध्ये आले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून मावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले बापू भेगडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. रविवारी याबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली त्यानंतर सोमवारी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
सोमाटणे फाटा ते मुंबईपर्यंत भव्य रॅली काढून शेवटी भाजपा पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बापू भेगडे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार होता. मात्र या पक्षप्रवेशावेळी बापू भेगडेच गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळाले. पक्षप्रवेशचा कार्यक्रम आधीच ठरला असल्याने बापू भेगडे यांच्या व्यतिरिक्त रामदास काकडे, बाबुराव वायकर, सुभाष जाधव, किशोर भेगडे, सचिन घोटकुले या प्रमुख नेत्यांचा समावेश असून यांच्यासह आतिष परदेशी, संग्राम काकडे, शिवाजी आसवले, संतोष मुऱ्हे, प्रवीण काळोखे, तुषार भेगडे, अरूण माने, अरूण चव्हाण, तनुजा जगनाडे त्यांचा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.
मात्र ज्या प्रवेशाची चर्चा जोरदार सुरू होती ते बापू भेगडे ऐन वेळेस पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला का आले नाहीत? यादेखील चर्चांना उधाण आलं. त्यामुळे भाजपचे मावळमधील नेते आणि किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “बापू भेगडे यांच्या वैद्यकीय कारणांमुळे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत मावळमध्ये मोठा मेळावा आयोजित करून बापू भेगडे आणि त्यांच्या समर्थकांचा भाजपमध्ये औपचारिक प्रवेश होईल.”
बापू भेगडे हे परगावी गेल्याने प्रवेश लांबला असल्याचं देखील काहींकडून सांगण्यात आलं. पक्षप्रवेशाचा मूर्त हुकण्या वैद्यकीय कारण सांगण्यात येत असलं तरी रात्रीतून झपाट्याने राजकीय चक्र फिरल्यामुळे हा प्रवेश लामणीवर वरती पडले असल्याचा देखील चर्चा सध्या मावळच्या वर्तुळात सुरू झाले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात बापू भेगडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार की आणखी काही राजकीय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.