
रोहित पवारांकडून ‘खास’ शुभेच्छा…
राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासह विविध सामाजिक मुद्द्यांवर आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे.
पण यावेळी त्या कुणा मंत्र्यांचा किंवा नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून नाही तर त्यांचे पती अनिश दमानिया यांच्यामुळे. त्याला निमित्त ठरले आहे, आमदार रोहित पवार यांची सोशल मीडियातील पोस्ट.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक बातमीच्या आधारे सोशल मीडियात पोस्ट केली आहे. अनिश दमानिया यांची राज्य सरकारच्या MITRA या प्रोजेक्टमध्ये सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्तही पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट केले आहे.
पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारची think tank असलेल्या मित्रा (MITRA) च्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन! एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया ताई ‘सामाजिक’ क्षेत्रात योगदान देत आहेत. आता अनिशजी यांचे ‘आर्थिक विकासाच्या’ क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातले combination निश्चितच महत्वपूर्ण राहील.
रोहित पवारांचे ही पोस्ट चर्चेत आली आहे. अंजली दमानिया यांनीही ही पोस्ट शेअर केली. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी या पोस्टवर आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. रोहित पवारांचे ट्वीट खोचक आहे, असे पत्रकार म्हणत होते. पण मी ते ट्विट वाचल्यावर मला तितकस वाईट वाटलं नाही. हे तर अपेक्षित होतं, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
अनिश, हा त्याच्या ऑफिस मधील तिसरा असा व्यक्ती आहे, जो FICCI चा सभासद झाला. म्हणून त्याला MITRA वर मानद सल्लागार म्हणून घेतला आहे. ह्या रोल साठी तो दीड दमडी घेणार नाहीये. त्याला ना राजकारणाशी घेणं देणं, ना सरकार शी. माझ्यासारखं त्यालाही देशाला पुढे नेण्यासाठी आपले योगदान द्यायचं आहे, तो ते ह्या स्वरूपात देतोय. ही बातमी त्याने Linkedin व facebook वर स्वतःच शेअर केली, ती मी देखील माझ्या फेसबुकवर शेअर केली. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही, मला तर त्याचा खूप अभिमान आहे, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.