
बाळासाहेबांच्या नातवाबद्दल अनुराग कश्यपची प्रतिक्रिया; म्हणाला…
अनुराग कश्यप बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अनेकदा तो विविध मुद्दयांवर त्याच्या प्रतिक्रिया देत असतो.
यामुळे तो अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतो. अशातच आता त्याने त्याच्या आगामी चित्रपटातील नायकाबद्दल म्हणजेच ऐश्वर्य ठाकरेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
अनुरागचा आगामी चित्रपट ‘नीशांची’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे मुख्य भूमिकेतून झळकणार आहे. यामधून तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. अशातच आता अनुरागने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या सिनेमातील नायकाबद्दल प्रतिक्रिया देत कौतुक केलं आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधताना ऐश्वर्य ठाकरेबद्दल अनुराग म्हणाला, “मी अशा कलाकारांच्या शोधात असतो जे माझ्या पात्राना साजेसा न्याय देतील. मी त्याने मनोज बाजपेयीच्या चित्रपटातील म्हटलेला मोनोलॉग पाहिला होता. मला माहित नव्हतं तो ठाकरे आहे; किंवा तो मराठी आहे. मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हा त्याने मला सांगितलं तो कोण आहे. त्याला संगीताची जास्त आवड आहे आणि त्याचबरोबर तो अभिनयसुद्धा करतो. मी त्याला स्क्रीप्ट दिली आणि तो खूप उत्सूक झाला.
अनुराग पुढे म्हणाला, “मी ऐश्वर्यला ताकीद दिलेली की, तो दुसरा कुठलाही चित्रपट करू शकत नाही. त्याला या चित्रपटासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल कानपुरी व्हावं लागेल आणि त्याने ती मेहनत घेतली. त्याने त्याच्या आयुष्यातील चार वर्षं मला दिले. हीच माझी अट होती. मी अशी अट ठेवलेली कारण हा खूप वेगळा चित्रपट आहे आणि इतर कुठल्या चित्रपटाबरोबर याची तयारी करणं कठीण गेलं असतं.” या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे कानपुरमधील मुलाची भूमिका साकारत आहे.
दरम्यान, अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘नीशांची’ चित्रपट येत्या १९ ऑग्स्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अळीकडेच या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झालेला. ऐश्वर्य ठाकरेने पूर्ण चार वर्षं या चित्रपटासाठी मेहनत घेतली असून तो दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे.