
उद्धव ठाकरेंनी थेटच सांगितलं…
राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत असलेल्या ठाकरे बंधूंमधला दुरावा दिवसेंदिवस कमी होत आहे. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सतत एकमेकांची भेट घेत आहेत.
त्यातच आता गेल्या बुधवारी १० सप्टेंबरला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. ही भेट कोणत्या कारणासाठी होती, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. आता उद्धव ठाकरे यांनीच या भेटीमागील खरे कारण स्पष्ट केले आहे.
धाराशिवमधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाचे सर्वसर्वा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल भाष्य केले. या दरम्यान उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्यामागील खरं कारण काय होते, याबद्दलची माहिती दिली. “मी गेलो तरी प्रॉब्लेम नाही गेलो तरी प्रॉब्लेम,” असे म्हणत त्यांनी भेटीबद्दलच्या चर्चांवर मिश्किल टिप्पणी केली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“”मी गणपतीच्या वेळी त्याच्याकडे (राज ठाकरे) गेलो होतो. तो माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आला होता. गणपतीला मी गेलो होतो तेव्हा त्याने मी किती मोदक खाल्ले होते ते सांगितले. त्यावेळी मला मावशीने ‘असाच येत राहा, येऊन भेट’ असे सांगितले होते. त्यामुळे आता इतक्या वर्षांनी आमचं येणं-जाणं सुरू झालं आहे.” असे स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिली. त्यामुळे ही भेट कौटुंबिक स्वरूपाची होती. यामुळे या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला आहे.
यावेळी एका पत्रकाराने दसरा मेळाव्याला राज ठाकरे येणार का असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर त्यांनी “थांबा ना येतील”, असे म्हटले आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच नजरा याकडे लागल्या आहेत.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे हे विविध निमित्ताने एकत्र येत आहेत. मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही भावांनी एकत्र येऊन भूमिका घेतली होती. त्यामुळे ठाकरे आणि मनसे एकत्र येतील का, अशा चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांमधील भेटीगाठी वाढत असल्यामुळे भविष्यात ठाकरे आणि मनसे यांच्यात राजकीय आघाडी होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी ही भेट केवळ कौटुंबिक स्वरूपाची असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याने राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.