
देवाभाऊवरील टीका विखे पाटलांच्या जिव्हारी; शरद पवारांना दिलं जोरदार प्रत्युत्तर !
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर जोरदार टीका केली.
यावेळी त्यांनी नेपाळचे उदाहरण देत सल्ला देखील दिला. मात्र यानंतर सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शेतकरी आक्रोश मोर्चादरम्यान बोलताना शरद पवार म्हणाले, ‘देवाभाऊ देशाच्या आजूबाजूला बघा काय घडत आहे.
नेपाळमध्ये काय घडत आहे, ते पाहा. तेथील राज्यकर्ते गेले आणि त्या ठिकाणी एक भगिनी आली आणि तिच्या हातात तेथील सत्ता देण्यात आली. नेपाळच्या घटनेवरून देवाभाऊ आणि आमचे सहकारी शहाणपण शिकतील असं म्हणत आणखी काही मी बोलणार नाही.’
यानंतर मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला वाटतं की आता काही लोकांनी निवृत्ती स्वीकारली पाहिजे. लोकांनी त्यांना निवृत्त करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून स्वीकारली तर ते अधिक योग्य ठरेल.
मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचे जे पाप शरद पवार यांनी केलं आहे. त्यांनी त्याबाबत प्रायश्चित करणे आवश्यक आहे. आम्हाला सल्ले देऊ नये. आपण केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त करावे. याबाबत समाजाला पूर्वी कल्पना नव्हती. मात्र आता सर्व माहीता झालं आहे. त्यामुळे आम्हाला सल्ले देणं त्यांनी बंद केलं पाहिजे, असं विखे पाटील म्हणाले.
वंजारी समाजाकडून एसटी प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश व्हवा अशी मागणी करण्यात येत आहे. त्याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘प्रत्येकाला आपल्या न्यायीक मागण्या मागण्याचा अधिकार आहे. घटनेने त्यांना तो अधिकार दिला आहे आणि शासन म्हणून सर्वांचा सर्वांगीण विकास याचा विचार करावाच लागतो. त्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.