दैनिक चालू वार्ता वृत्तपत्र मारेगाव प्रतिनिधी
(मारेगाव) : जिल्हा क्रीडा संकुल समितीअंतर्गत आझाद मैदान येथे सुरू असलेल्या जलतरण तलाव व संबंधित विकास कामांची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी केली. कामे विहित वेळेत पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुसकवार, क्रीडा अधिकारी महेश पडोळे, शमहेश पडोळे, सचिन हरणे, मनीष डोळसकर, संकुलातील कर्मचारी तसेच जलतरण तलाव व कॅपिटेरिया बांधकामाचे कंत्राटदार उपस्थित होते.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कॅपिटेरिया बांधकामाच्या संथ गतीबाबत नाराजी व्यक्त केली. निर्धारित वेळेत काम पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले. तसेच कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवत आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सदर विकास कामांची सविस्तर माहिती जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुसकवार व क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
