दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी -विजयकुमार चिंतावार
समाजामध्ये आपण इतरांना काही देण्यापेक्षा इतरांकडून घेणारीच माणसं समाजात अधिक असून आपल्या १०० पिढ्यांची सोय करूनही त्यांची तृष्णा काही संपत नाही . त्यामुळेच राजकारणासह समाजकारणाची दिशा बदललेली आहे . परंतु अशा संघर्षमय कालखंडातही समर्पण परिवाराने दुःखीतांच्या दुःखावर फुंकर घालून नवा आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ . श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले .
सेवा समर्पण परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २ एप्रिल रोजी शहारातील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा स्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अव्वर सचिव राजेंद्र खंदारे हे होते , तर प्रमुख पाहुणे म्हणून भोकर येथील कैलास गडाचे महंत उत्तम बन महाराज, प्राचार्य पंजाब चव्हाण आदींची उपस्थिती होती
पुढे बोलताना सबनीस म्हणाले की ,आपल्या महापुरुषांच्या अलौकिक कार्यातील सत्य व सामर्थ्याची बेरीज केली तर आपण विश्वधर्म, विश्व संस्कृती, व विश्व कल्याण घडवून आणता येईल यात सर्वांचेच हित आहे . मात्र आज देशातील लोकशाहीचे सर्व स्तंभ कमकुवत झाले असून लोकशाही धोक्यात आली असल्याची चिंता व्यक्त केली. मानवी सेवेसाठी सेवाभावाने संवेदनेचं नातं जोडलं जातं असे सांगून समर्पण परिवाराने सेवाभावातून मागील चार वर्षात केलेल्या विधायक कार्याची प्रशंसा त्यांनी केली. तसेच सेवा समर्पण परिवाराच्या आदर्श सेवा कार्याचे पॅटर्न सरकारने आदर्श म्हणून स्वीकारावे असे प्रतिपादनही त्यांनी केले . आज काल मोठेपणा करीता स्वतः हून पैसे देऊन पुरस्कार ही विकत घेतले जातात आणि पुरस्कार मिळाल्याचा मोठेपणा करत हे मिरवतात हे कितपत योग्य आहे असेही ते म्हणाले, पण बारगजे हे याउलट असून यांना सन्मानाने असे कित्येक पुरस्कार मिळाले पण त्यांना त्या पुरस्काराबाबद काही मोठेपणा वाटत नसल्याचे दिसत आहे. बाबा आमटेंचा आदर्श घेऊन एड्सग्रस्तांसाठी कार्य करणाऱ्या दत्ता बारगजे यांच्या कार्याचे कौतुक शब्दात करता येणार नसल्याचे सांगून सौ संध्याताई व दत्ता बारगजे दाम्पत्यांना दोन्ही हात जोडून वंदन केले व त्यांनी करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली .
निस्वार्थ भावनेतून समाजातील उपेक्षितांसाठी कार्य करणाऱ्या संस्था तथा व्यक्तींना तसेच साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना दरवर्षी संस्थेच्या वतीने पुरस्कार दिला जातो . यावर्षी मागील १९ वर्षांपासून समाजातील एड्सग्रस्तांसाठी अविरत पणे सेवा देणाऱ्या सौ संध्या दत्ता बारगजे व दत्ता बारगजे या दांपत्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा स्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले . तसेच साहित्यातील योगदानाबद्दल साहित्यिक आसाराम लोमटे यांना साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .याप्रसंगी दत्ता बारगजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .बाबा आमटेच्या परिसस्पर्शाने प्रेरित होऊन समाजातील एचआयव्ही बाधितांसाठी आपण काम करीत असताना लेकरांना शाळाबाह्य राहावे लागत असल्याची खंत व्यक्त केली .
साहित्यिक आसाराम लोमटे यांनी शब्दांचे महात्म्य सांगून वेदनेचे निराकरण करणारी माणसं हीच साहित्य निर्मितीची ऊर्जा असतात .उजेडासह माणसात सामाजिक कार्याची आग असावी लागते, ती आग समर्पण परिवारातील सर्व स्वयंसेवकांमध्ये दिसून येत आहे अशा शब्दात संस्थेच्या कार्याचा गौरव करीत कार्याविषयी समाधान व्यक्त केले .
अध्यक्षीय समारंभातून राजेंद्र खंदारे यांनी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण आदी महत्त्वपूर्ण क्षेत्रातील समर्पण परिवाराच्या भरीव योगदान बद्दल त्यांचे कौतुक केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले . तसेच तलावात बुडून मृत्यू झालेल्या तलाठी नरेंद्र मडगुलवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . समर्पण परिवार संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी संस्थेने मागील चार वर्षात घडवून आणलेल्या कार्याची थोडक्यात माहिती देऊन भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या सेवा कार्याची माहिती दिली .
भोकर मेडिकल असोसिएशनच्या वतीने दत्ता बारगजे यांना ८५ हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली .
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर , ओबीसी नेते नामदेव आयलवाड, माधव अमृतवाड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख, डॉ . साईनाथ वाघमारे ,ज्येष्ठ संपादक उत्तम बाबळे, बालाजी तुमवाड , प्रा. व्यंकट माने आदी मान्यवरांसह अनेक जण उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन प्रा . मीरा जोशी यांनी केले तर विठ्ठल फुलारी यांनी आभार मानले .
