दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
वाशिम : पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे मानाने पाहिल्या जाते. या क्षेत्रात काम करणारा समाजसेवेचा वसा जोपासत सदैव लोक कल्याणासाठी झटणारा पत्रकार हा मुख्य घटक आहे. समाजात घडणाऱ्या व समाज हिताच्या आड येणाऱ्या विविध घटकांचे अवलोकन करून सामाजिक प्रगतीसाठी तो रात्रंदिवस झटत असतो. तथापि दैनिक, साप्ताहिक,विविध वृत्तवाहिन्या आदी माध्यमातून आपलं अख्ख आयुष्य देश सेवेसाठी समाज हितासाठी वेचणाऱ्या पत्रकारांच आयुष्य मात्र विविध विवंचनेत अडकले आहे. ही पत्रकारितेतील सर्वात मोठी शोकांतिका असून आजमितीस अनेक पत्रकारांना अत्यंत खडतड अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामधे प्रामुख्याने आपत्कालीन कोरोना काळात सर्वाधिक नुकसान हे पत्रकारांचे झाले असून, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.परिणामी संबंधितांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवल्याचं हृदयद्रावक दृष्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या निदर्शनास आल्यामुळे अशी दुर्दैवी वेळ भविष्यात पत्रकारावर येऊ नये म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या हितासाठी झटणाऱ्या संघटनेचा उदय झाला आहे. त्यांच्या संकल्पनेतून, पत्रकारांच्या हितासाठी त्यांच्या कुटुंबासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे पाऊल संघटना उचलत आहे. आज ही अनेक पत्रकारांना अगदी नगण्य अशा तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे तर ग्रामीण क्षेत्रातून काम करणाऱ्यांना इंधन खर्च वसूल होण्याइतपत मानधन सुद्धा मिळत नाही हे या क्षेत्रातील भीषण वास्तव आहे. पत्रकारांना सुद्धा परिवार आहे त्यामध्ये कुटुंबातील वयोवृद्धाचे आजारपण, मुलांचे आरोग्य, शिक्षण, उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या दैनंदिन गरजा आदी अडचानिसह सामाजिक स्तरातून विविध स्वरूपाचा अन्याय दूर करण्यासाठी सरकारने पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एक स्वतंत्र पत्रकार कल्याण महामंडळ स्थापन करण्याची गरज असून त्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी आवाज उठवणार असल्याचे प्रतिपादन संघटनेचे ग्रामीण प्रदेशाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार अनिल मस्के यांनी केले ते व्हॉईस ऑफ मीडियाच्या कौटुंबिक स्नेहमिलन कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
सदर कार्यक्रमाचे उद्धघाटन वाशिमचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. दिपक शेळके यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेच्या कार्यालयीन सचिव दिव्या भोसले पाटील, साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, रिसोड पंचायत समितीच्या माजी सभापती सुशिलाताई शिंदे, दिव्या देशमुख, वाशिमचे जेष्ठ पत्रकार नंदकिशोर शिंदे, प्रा. राम चौधरी आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, उपस्थित मान्यवरांचा व व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या पदाधिकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांनी संघटनेच्या ध्येयधोरणाची विस्तृत माहिती दिली. यावेळी नवनियुक्त पदाधिकऱ्यांना नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रवक्ता देव इंगोले यांनी तर आभार उपाध्यक्ष आकाश पाटील शिंदे यांनी मानले. सदर कार्यक्रमास संघटनेचे जिल्हा,तालुका,शहर पदाधिकारी सहकुटुंब उपस्थित होते.
व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडणारी संघटना..!
___ दिव्या भोसले पाटील

कोरोना महामारी व त्या नंतरच्या काळात पत्रकारांच्या कुटुंबियांवर ओढवलेले दुःख पहावले गेले नसल्याने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेतून ” व्हॉईस ऑफ मीडिया ” चा जन्म झाला आहे. या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांच्या शिक्षण, आरोग्य, व निवारा आदी मूलभूत समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी संघटना म्हणून अल्पावधीतच व्हॉईस ऑफ मीडिया नावलौकिकास पात्र झाली असल्याचे मत संघटनेच्या कार्यालयीन सचिव दिव्या भोसले पाटील यांनी व्यक्त केले.
