दै.चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा.दवणे…
जालना (मंठा ) महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मराठवाडा सामाजिक फाउंडेशन च्या मंठा तालुका अध्यक्षपदी सुरज टेकाळे यांची नियुक्ती करण्यात आली. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टरपले यांनी नियुक्तीचे पत्र दिले. येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवार ता.१५ रोजी आयोजित बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी कार्याध्यक्ष मोसीन कुरेशी, उपाध्यक्ष गजानन माळकर तर सचिवपदी भगवान गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीला मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजीराव बल्लाळ, प्रदेश विस्तारक ओंकार गांजवे, सचिव विठ्ठलराव काळे, सामाजिक कार्यकर्ते महादेव गायके, ज्येष्ठ पत्रकार पंडितराव बोराडे, बाजार समितीचे सचिव रमेश बोराडे, पत्रकार संतोष दायमा, बालाजी कुलकर्णी, रंजीत बोराडे, मानसिंह बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टरपले यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्या पासून या सामाजिक संघटनेची सुरुवात झाली असून आज घडीस मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात संघटनेचे कार्य चालू आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळाची परिस्थिती, विद्यार्थी – बेरोजगारांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. नोकरी व उद्योग धंद्यासाठी मराठवाड्यातून अनेक लोकांचे स्थलांतर होत असून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटना अविरत कार्य करीत आहे. गाव पातळीवरील प्रश्नही संघटनेच्या माध्यमातून सोडविले जाऊ शकतात. संघटन मजबूत असेल तर प्रशासनाला दखल घ्यावी लागते असे त्यांनी सांगितले. मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला शेख अशपाक, एकनाथ जाधव, सुरज वायाळ, खलील कुरेशी, सुनील गुंड, अनिकेत देशमाने, अनिकेत सहजराव, अजय वाघमारे यांची उपस्थिती होती. उपस्थित त्यांचे आभार पत्रकार रणजीत बोराडे यांनी मानले.
