दैनिक चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी -भारत पा.सोनवणे
शहरात नागरीकांची समाजहितासाठी व्यसन व विकारांवरील होळी
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर):- शहरासह तालुक्यात सायंकाळी पारंपारिक पध्दतीने विधिवत पूजा अर्चा करुन होळीचे दहन करुन सण उत्साहात साजरा करण्यात आला. होळी भोवताली तरुणांनी, बालगोपाळांनी शंखध्वनी करत मोठ्या आनंदाने उत्साहात होळी सण साजरा केला. घरोघरी आकर्षक रांगोळ्या, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होलिका दहन करण्यात आले.
वैजापूर शहरातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी यंदाही पारंपरिक होळीच्या निमित्ताने व्यसन आणि विकारांवरील (बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा यांची रिकामी पाकिटे, दारूच्या बाटल्यांचे रिकामे खोके)होळी पेटवून समाजहिताचा संदेश दिला. महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.सायंकाळी सहा वाजता महात्मा फुले पुतळा परिसरात हे अनोखी होळी करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी धुलीवंदन व रंगोत्सव साजरा करण्यात आला. पिचकारीत रंग भरून उडविले जात होते. सर्व समुदायाच्या नागरिकांनी एकमेकांना गुलाल रंग लावून “बुरा ना मानो होली हैं” असे म्हणत रंग उधळले. ठिकठिकाणी जुन्या, नव्या हिंदी-मराठी होळी गीतावर डीजे, ब्रँडच्या तालावर तरुणाई थिरकत होती. महिला व तरुणी एकमेकांना रंग लावून होळी सण उत्साहात साजरा केला.
