निवृत्त लष्करी जवानाने मंदिराला दान केली ४ कोटींची संपत्ती…
लष्करातून निवृत्त झालेले जवान एस विजयन(६५) यांनी त्यांच्या मुलीने वारसा हक्कावरून त्यांचा अपमान केल्याने त्यांची ४ कोटी रूपयांची संपत्ती एका मंदिराला दान केल्याचा प्रकार समोर आला आहे.
त्यांनी तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील अरुलमिगु रेनुगांबल अम्मान (Arulmigu Renugambal Amman Temple) मंदिराला ही देणगी दिली आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वानांच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
त्यांच्या मुलीकडून वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्याच्या आणि दुखावले गेल्याच्या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मुलीबरोबर वारसा हक्काबाबत त्यांचे मुलीशी वाद देखील झाला होता. मात्र कुटुंबियांकडून आता ही संपत्ती परत घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
विजयन हे अराणी शहराजवळ असलेल्या केशवपुरम गावातील आहेत. ते त्यांच्या दोन मालमत्तांची कागदपत्रे घेऊनच मंदिरात गेले. ज्यापैकी मंदिराच्या जवळ असलेल्या एकाची किंमत ३ कोटी असून दुसर्याची किंमत १ कोटी रुपये आहे.
२४ जून रोजी जेव्हा मंदिराच्या कर्मचार्यांनी दुपारी १२.३० वाजता मिळालेलं दान मोजणीसाठी दानपेटी उघडली तेव्हा त्यांना त्यामध्ये ४ कोटी रुपये किंमतीच्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे त्यामध्ये आढळून आली.
मंदिर प्रशासनाने दिली माहिती
एचआर अँड सीई (HR&CE) अधिकार्यांनी सांगितले की, दर दोन महिन्यांनी मंदिराच्या पाच कर्मचार्यांनी मिळून भाविकानी दिलेले दान मोजणे ही नियमित परंपरा आहे. मंदिरात एकूण ११ दान पेट्या आहेत. अशाच एका मोजणीवेळी त्यांनी मंदिराच्या समोरच्या बाजुला ठेवलीली हंडी (दानपेटी) उघडली आणि त्यामध्ये नाणे आणि नोटांबरोबरच त्यांना मालमत्तेची मूळ कागदपत्रे आढळल्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले.
इतकेच नाही तर अधिकाऱ्यांना भक्ताने हाताने लिहिलेली चिठ्ठी देखील सापडली, ज्यामध्ये तो स्वच्छेने संपत्ती मंदिराला दान करत असल्याचे म्हटले होते. “असं काहीतरी होण्याची ही पहिलीच वेळ आहे,” असे मंदिराचे कार्यकारी अधिकारी एम सिलंबरसन म्हणाले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की फक्त कागदपत्रे दानपेटीच टाकल्याने संपत्ती आपोआप मंदिराची होत नाही. मंदिर कायदेशीररित्या त्यावर दावा करण्यासाठी भक्ताने देणगीची अधिकृतपणे विभागाकडे नोंदणी करावी, असे त्यांनी द हिंदूशी बोलताना सांगितले.
विजयन हे रेनुगांबल अम्मान यांचे सुरूवातीपासूनच भक्त आहेत असे सांगितले जाते. चौकशीदरम्यान मंदिराच्या अधिकाऱ्यांना आढळून आले की, विजयन हे पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर जवळपास १० वर्षांपासून एकटेच राहत आहेत. या काळात त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून कसलीही मदत मिळाली नाही. तसेच गेल्या काही महिन्यांपासून त्यांची मुलगी संपत्ती तिला देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचेही आढळून आले आहे.
मंदिर अधिकाऱ्यांनी सांगितले की हुंडीमध्ये सापडलेले दोन मालमत्तेचे कागदपत्रे १० सेंट जमीन आणि मंदिराजवळील एक मजली घराचे आहेत. त्यांनी असेही सांगितली की, सध्या तरी ही कागदपत्रे भाविकाला परत करता येणार नाहीत, कारण वरिष्ठ एचआर अँड सीई अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे आणि ते काय करायचे ते ठरवतील. तोपर्यंत विभागाकडून कागदपत्रे सुरक्षित ठेवली जातील.
मी मागे हटणार नाही
मंदिराच्या अधिकार्यांशी बोलल्यानंतर मी कायदेशिरपणे माझी संपत्ती अधिकृतरित्या मंदिराच्या नावे नोंदवेन. मी माझा निर्णय मागे घेणार नाही. माझ्या दैनंदिन गरजांसाठी देखील माझ्या मुलांनी माझा अपमान केला, असे विजयन म्हणाले.
