तिहेरी भाषा आणि पहिलीपासून हिंदी हे महायुती सरकारचे धोरण विचारात आहे. या धोरणाने मराठी माणसांचे राजकारण करणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना नवी इनिंग खेळण्याची संधी मिळाली आहे.
त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची कोंडी होण्याची शक्यता आहे.
महायुती अर्थात प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात तिहेरी भाषेचे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र यामध्ये कोंडी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची होईल असे सध्याचे चित्र आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी भाषा हा संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा विषय घेऊन पाच जुलैला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. कोणत्याही पक्षांचे झेंडे नसलेला आणि शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा पुढाकार असलेला हा मोर्चा असेल.
या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी पहिली पासून हिंदी हा विषय कसा महत्त्वाचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रामुख्याने सीबीएससी पॅटर्न हा त्यांचा आधार होता.
मुळातच दादा भुसे हे अभ्यासू मंत्री किंवा प्रभावी वक्ते अशी त्यांची प्रतिमा नाही. राज ठाकरे हे कोणताही निर्णय विचारपूर्वक आणि सर्व बाजू तपासून घेतात हा आजवरचा इतिहास आहे. या स्थितीत दादा भुसे यांनी राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन करावे हाच चर्चेचा आणि बातमीचा विषय होता.
या संदर्भात राज ठाकरे यांनी दादा भुसे यांच्या भेटीनंतर पत्रकारांची संवाद साधला. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे कोणतेही मुद्दे नव्हते. मंत्री भुसे ठराविक मुद्देच वारंवार सांगण्याचा प्रयत्न करीत होते. राष्ट्रीय स्तरावरील धोरणात पहिलीपासून हिंदी किंवा तीन भाषा कुठेही नाहीत, याचे उत्तर दादा भुसे यांना देता आले नाही. त्यामुळे दादा भुसे यांची राज ठाकरे यांची बैठक घेऊन हात दाखवून अवलक्षण अशीच स्थिती झाली, असे म्हणता येईल.
एकनाथ शिंदेंची कोंडी
राज ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करतानाचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जिव्हाळ्याचा विषय पुन्हा एकदा जिवंत केला आहे. त्यात जीव ओतण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. भाजपच्या अजेंड्यानुसार हा विषय आहे. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जाण्याचा दावा करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी कोंडी होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांची सध्याची स्थिती धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी आहे. त्यामुळे हा हा विषय राज्यभर चर्चेचा ठरला आहे.
इकडे आड तिकडे विहीर स्थिती
बाळासाहेब ठाकरेंचे वारस आपणच असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंना हिंदी पहिलीपासून शिकवण्याच्या धोरणावर ठोस भूमिका घेता येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे धोरण म्हणून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे पहिलीपासून हिंदी कसे योग्य हे सांगत आहेत. मात्र, ज्या मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेचा जन्म झाला त्याच पक्षाने असे हिंदीचे लंगडे समर्थन करणे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या पक्षाला ठोस विरोधही करता येईना आणि समर्थनही करता येईना म्हणजे त्यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.
