दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
पुणे :- पुणे पुण्यात खडकी येथे दिव्यांग सैनिकांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या क्वीन मेरीज तंत्रज्ञान संस्थेला (क्यूएमटीआय)) महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 29 डिसेंबर रोजी भेट दिली आणि पुनर्वसनासाठी प्रशिक्षण घेत असलेल्या दिव्यांग सैनिक विद्यार्थ्यांची भेट घेतली. माननीय राज्यपालांनी कार्यशाळा,वर्ग कक्षाला भेट दिली आणि सैनिकांशी संवाद साधला.राष्ट्रसेवेत असताना दिव्यांग झालेल्या सैनिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी क्यूएमटीआयच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची माननीय राज्यपालांनी प्रशंसा केली.
1917 मध्ये स्थापित, क्यूएमटीआय ही 104 वर्षे जुनी संस्था आहे आणि सेवारत आणि सेवानिवृत्त जखमी सैनिकांना, सेवांमधून निवृत्त झाल्यानंतरच्या जीवनात त्यांचे सन्मानाने पुनर्वसन व्हावे यादृष्टीने पुनर्वसन प्रशिक्षण देणारी भारतातील अशा प्रकारची ही एकमेव संस्था आहे. ही संस्था दिव्यांग सैनिकांना आयटीआय अभ्यासक्रम, पुणे विद्यापीठाद्वारे व्यवस्थापन अभ्यासक्रम आणि एनआयईएलआयटी द्वारे प्रमाणित संगणक अभ्यासक्रमांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देते.क्यूएमटीआयने स्थापनेपासून 12000 हून अधिक दिव्यांग सैनिकांना पुनर्वसन प्रशिक्षण दिले आहे.क्यूएमटीआय प्रशिक्षित सैनिकांना अग्रगण्य औद्योगिक वसाहतींमध्ये आणि विविध राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे.माननीय राज्यपालांनी नंतर पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्र (पीआरसी), खडकी येथेही भेट दिली आणि तेथील रहिवाशांशी संवाद साधला.त्यांनी पीआरसीद्वारे आयोजित केलेल्या पुनर्वसन प्रशिक्षणाची प्रशंसा केली.
दक्षिण कमांड मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, क्यूएमटीआयचे अध्यक्षदेखील असलेले दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उप क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर जनरल इंद्रजीत सिंह माननीय राज्यपालांच्या भेटीवेळी उपस्थित होते.
