रवींद्र चव्हाणांविरोधातील पंग्यावर नीलेश राणेंची सूचक तयारी !
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार नीलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरातून मोठी रक्कम पकडून दिल्यानंतर महायुतीमधील भाजप अन् शिवसेनेतील संबंधांवर थेट परिणाम झाला आहे.
भाजपकडून वारंवार डिवचलं जात असून, यावर आता नीलेश राणे देखील माझ्याविरोधात काय-काय होईल, याची मला सर्व माहिती आहे. ‘पोलिस अधिकारी अन् निवडणूक अधिकाऱ्यांनी पैसे जप्त केले आहे. याचा अर्थ गुन्हा झाला आहे. पण माझ्या लफड्यात पडू नका. मी थेट आऊट करतो,’ असा सूचक इशारा नीलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांचे नाव न घेता दिला आहे.
सिधुंदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नीलेश राणे यांनी भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरी प्रवेश करून तपासणी केली. यावेळी त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळली. ही रक्कम पोलिस अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. यावरून नीलेश राणे आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे.
नीलेश राणे म्हणाले, पोलिस अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसला जाऊन पुढची प्रोसिजर काय हे विचारलं होत. पैसे जप्त केले, असं मला त्यांनी सांगितलं. याचा अर्थ गुन्हा झाला. मात्र कारवाई झाली नाही किंवा नोटिस पण पाठवली नाही. हे पण मला अपेक्षित होत.
विजय केनवडेकर यांनी नीलेश राणे अनधिकृतरित्या घरात घुसल्याचा आरोप केला आहे. त्यावर बोलताना, नीलेश राणे यांनी, “मी परवानगी मागून आत गेलो. ज्यांनी दरवाजा उघडला, त्यांनी मला रोखायला हवं होतं. मग अनधिकृत कस? मी आरोपीचा पाठलाग केला म्हणजे, केस माझ्यावर होणार का? मी क्राइम शोधून दिलाय, पोलिसांना आपण काय आरोप करतोय याची लाज वाटली पाहिजे. यांना विषय डायवर्ट करायचा आहे. जो व्यवहार झाला तो कोणासोबत झाला त्याचं नाव सांगा.
आरोप थेट रवींद्र चव्हाण यांच्यावर
‘रक्कम जप्त केली म्हणजे, गुन्हा झाला. मग रक्कम जमा का केली? पाणी कुठे तरी मुरतंय? तिकडे जे होते, त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत. चुकीच होतंय असं वाटलं, तर मी आवाज उठविणार. मी पुराव्यानिशी बोलतो आहे. माझा आरोप थेट रवींद्र चव्हाण यांच्यावर आहेत आणि त्यांची लोक यातून वाचू शकत नाही. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे,’ असेही नीलेश राणे यांनी म्हटले.
मला वाटलं गडबड आहे
‘मंत्री नितेश राणे यांच्यापाठोपाठ शिवसेना नेता मंत्री उदय सामंत येऊन गेले. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही आरोप करायला हवे होते. तुम्ही का थांबलात? तेव्हा तुम्ही तक्रार करायला हवी होती. मला वाटलं गडबड आहे, म्हणून मी त्याचा पाठलाग केला. तुम्ही का केलं नाही, याचा विचार करा. तुमचे कार्यकर्ते वाटपात बिझी होते,’ असा टोलाही नीलेश राणेंनी लगावला.
मी थेट आऊट करतो
‘रवी चव्हाण साहेबांच्या जवळच्या लोकांनी गाडी, घर, सोनं याच बुकिंग करून ठेवले आहेत. ते आपलं कपाट भरत आहेत. मतदारांना सगळे पैसे मिळणार नाहीत. माझ्या लफड्यात पडू नका. मी थेट आऊट करतो,’ असा इशारा नीलेश राणे यांनी दिला.
तुमचे हात स्वच्छ व्हावे, म्हणून…
‘आमच्या विरोधात पुरावा द्या. तुमच्याकडे सगळी सत्ता आहे. माझा फोन टॅप करू शकता. लोकेशन चेक करू शकता. जे करायचं आहे ते करून टाका. धमकी का? भिजलेला माणूस पावसाला घाबरत नसतो. मला माहीत आहे, माझ्यावर काय होणार ते! माझे हात स्वच्छ आहेत, तुमचे हात स्वच्छ व्हावे, म्हणून हा प्रयत्न आहे,’ असे नीलेश राणेंनी सुनावलं.
