व्हाइट हाऊस म्हणजे अमेरिकेचा मेंदू. देशावर नियंत्रण ठेवण्याचे काम आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे केंद्र म्हणजे व्हाइट हाऊस आहे. त्यामुळे व्हाइट हाऊसजवळ कायम कडेकोट बंदोबस्त असतो.
पण याच व्हाइट हाऊसजवळ बुधवारी (ता. 26 नोव्हेंबर) गोळीबार झाल्याने अमेरिका हादरून गेली. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. हा गोळीबार वॉशिंग्टन डीसीमधील व्हाइट हाऊसजवळ तैनात असलेल्या नॅशनल गार्ड्सवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एका महिला गार्डचा मृत्यू झाला असल्याने याची घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घटनेनंतर आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चांगलेच संतापले आहेत. अमेरिकेतील सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आता ट्रम्प यांनी 19 देशांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
व्हाइट हाऊसजवळ हल्ला करणारा हल्लेखोर हा अफगाणचा नागरिक होता. त्यामुळे आता बाहेरील देशांतून येणाऱ्या लोकांमुळे अमेरिकेतील लोकांचा जीव धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे. ज्या कारणामुळे आता ट्रम्प यांनी 19 देशांमधील ग्रीन कार्ड धारकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. जे देश धोकादायक श्रेणीत आहेत, अशा 19 देशांमधून आलेल्या नागरिकांच्या ग्रीन कार्डची पुनर्तपासणी केली जाणार आहे. याबाबत यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसचे संचालक जोसेफ एडलो यांनी सांगितले की, सदर तपासणी अतिशय कठोर असेल. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळात मंजूर केलेल्या आश्रयांच्या प्रकरणांचा आणि 19 देशांमधील नागरिकांना देण्यात आलेल्या ग्रीन कार्डचा व्यापक आढावा घेतला जाणार असल्याचे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेवर बोलत असताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ज्याने हा गुन्हा केला त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल, असे त्यांनी सांगितले होते. हा हल्ला अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील सर्वात मोठा धोका आहे. अफगाणिस्तानातून येणाऱ्या प्रत्येकाची आता पुन्हा तपासणी केली जाईल आणि अमेरिकेसाठी फायदेशीर नसलेल्या किंवा आपल्या देशावर प्रेम न करणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना हद्दपार करण्यासाठी पावले उचलली जातील, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यामुळे आता या हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या निर्देशानुसार, 19 देशांची यादी तयार करण्यात आली असून यामध्ये अफगाणिस्तान, बर्मा, चाड, रिपब्लिक ऑफ काँगो, गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, येमेन, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे.
व्हाइट हाऊसबाहेर नॅशनल गार्ड्सवर गोळीबार करणाऱ्या संशयिताची ओळख पटली असून गोळीबार करणारा आरोपी रहमानउल्लाह लकनवाल (वय वर्ष 29) हा अफगाणी नागरिक आहे. 2021 मध्ये ‘ऑपरेशन अॅलीज वेलकम’ अंतर्गत तो अमेरिकेत आला होता. हल्लेखोर रहमानउल्लाह लकनवालाच्या व्हिसाची मुदत संपली होती आणि हल्ल्याच्या वेळी तो बेकायदेशीरपणे अमेरिकेत होता.
