साधुग्राम वृक्षतोडीविरोधात लेखक अरविंद जगताप यांची मार्मिक पोस्ट चर्चेत !
नाशिकमधील तपोवनातील साधुग्रामच्या जागेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींनी आंदोलन छेडलेलं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होऊ लागलं आहे. सिनेइंडस्ट्रीतले अनेक सेलिब्रिटी देखील यावर सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.
मराठी सिनेइंडस्ट्रीतले लोकप्रिय लेखक, पटकथा लेखक अरविंद जगताप यांनी देखील मार्मिक पोस्ट व्हायरल होत आहे.
मराठी सिनेविश्वातील एक लोकप्रिय लेखक अशी अरविंद जगताप यांची ओळख आहे. ‘चला हवा येऊ द्या’सारख्या खळखळून हसवणाऱ्या कार्यक्रमातील त्यांच्या संवेदनशील पत्रलेखानं सर्वांच्याच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक विषयांवर भाष्य केलंय.अरविंद जगताप नेहमीच समाजातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्यक्त होत असतात. आता त्यांनी नाशकातल्या वृक्षतोडीवरही भाष्य केलंय.त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
काय आहे अरविंद जगताप यांची पोस्ट?
एक एक मोठं झाडं तोडून दहा दहा नवी रोपं लावायची असतील, तर मग एक एक मोठा मंत्री काढून त्याजागी दहा दहा पीए ठेवले तरी काय हरकत आहे?
अरविंद जगताप यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, सेलिब्रेटींनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविल्यानंतर विविध राजकीय पक्षांसह संस्था-संघटनांनीही या या आंदोलनात उडी घेतल्यानं त्याला मोठं बळ मिळालं आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी रविवारी सकाळी थेट तपोवनात धडक देत वृक्षतोडीविरोधात आंदोलन केले. हातात निषेधाचे फलक घेऊन राज्य सरकार व महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. साधुग्रामच्या जागेत प्रदर्शन केंद्र (एक्झिबिशन सेंटर) उभारण्यास विरोध दर्शवत येथील वन नष्ट होऊ दिले जाणार नाही, वृक्षांची कत्तल होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली.
सयाजी शिंदेंचा इशारा
तपोवनातील साधुग्रामच्या जागेतील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी आंदोलन उभं केलं असून, या आंदोलनात वृक्षप्रेमी व अभिनेते सयाजी शिंदे उतरले आहेत. ‘तपोवनातील एकही झाड तुटता कामा नये, झाडे वाचली पाहिजेत, झुडपंच काय पण येथील गवताच्या काडीलासुद्धा हात लावू नका’, असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.
