दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा औंध प्रतिनिधी -निहाल मणेर
औंध, ता. ४ :
महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंध येथील श्रीयमाईदेवीच्या वार्षिक रथोत्सवात सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या रथोत्सवात राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचे ज्येष्ठ बंधू अंकुश गोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी, औंध जिल्हा परिषद गटाच्या नेत्या भारतीताई गोरे यांनी उपस्थिती दर्शवली.
रथोत्सवाच्या निमित्ताने श्रीयमाईदेवीचे दर्शन घेतल्यानंतर अंकुश भाऊ गोरे यांनी औंध जिल्हा परिषद गटातील जनतेसाठी देवीचरणी साकडे घातले. यावेळी त्यांनी औंधसह २१ गावांच्या सिंचन योजनेला मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून गती देणार असल्याचे ठाम आश्वासन दिले. दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणी व सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील शेती, रोजगार व जीवनमान उंचावण्यासाठी सिंचन सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे नमूद करत, औंध परिसरातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचा निर्धार अंकुश भाऊ गोरे यांनी व्यक्त केला. या योजनेमुळे शेतीला बळकटी मिळून परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी औंध जिल्हा परिषद गटाच्या नेत्या भारतीताई गोरे यांनी महिलांच्या पाणीटंचाईमुळे येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करत, सिंचन व पाणीपुरवठा योजनांमुळे महिलांचे श्रम कमी होऊन आरोग्य व शिक्षणावर सकारात्मक परिणाम होईल, अशी भावना व्यक्त केली. श्रीयमाईदेवीच्या कृपेने औंध परिसरातील विकासकामांना गती मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
श्रीयमाईदेवी रथोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, परंपरा आणि विकासाच्या अपेक्षा यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. ‘उदे ग अंबे उदे’च्या जयघोषात औंध नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
