दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा औंध प्रतिनिधी- निहाल मणेर
औंध, ता. ४ :
महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाईदेवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या भक्तिभावात, उत्साहात व पारंपरिक पद्धतीने पार पडला. “आई उदे ग अंबे उदे”च्या जयघोषाने संपूर्ण औंध नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
शंभर वर्षांहून अधिक परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक रथोत्सवास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष उपस्थिती लावली. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे रथोत्सवाला राजकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. अजित पवार यांनी श्रीयमाईदेवीचे मनोभावे दर्शन घेऊन राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. ग्रामदेवता आणि लोकपरंपरेशी नातं जपणाऱ्या या उत्सवात सहभागी होणे आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दुपारी सव्वा बारा वाजता रथोत्सवास प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार व श्री यमाई देवस्थानचे चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी मंदिरात उत्सवमूर्तीचे षोडशोपचार पद्धतीने विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर अजित पवार यांनी देवीची उत्थापना करून उत्सवमूर्ती सभामंडपात आणली. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते देवीचे विधिवत पूजन पार पडले. गणेश इंगळे व हेमंत हिंगे यांनी पौरोहित्य व मंत्रपठन केले.
दूध, दही व पुष्प अर्पण करून देवीची पूजा झाल्यानंतर चौपाळ्याजवळ देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृंदाच्या गजरात पालखी रथापर्यंत नेली. त्यानंतर देवीची ऐतिहासिक दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांसह
शहानवाज भरूचा,बोमी इराणी, निर्मला बनाजी, डरिएस सेठना सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे,प्रभाकर घार्गे ,हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, अब्बास आत्तार, प्रशांत खैरमोडे, दीपक नलवडे, योगेश फडतरे, शुभम शिंदे,मनोज देशमुख, गणेश देशमुख, अमर देशमुख, यशवंत देशमुख, रमेश चव्हाण, प्रदीप कणसे, संजय निकम, दीपक कर्पे, इलियाज पटवेकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर श्री यमाईदेवीच्या रथोत्सव मिरवणुकीस भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. रथाचे मानकरी, भाविक व ग्रामस्थांनी रथ ओढत मिरवणूक पुढे नेली. राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन रथावर एक रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या नोटा, नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, गुलाल व खोबरे अर्पण केले.
रथाच्या अग्रभागी डवरी, सनईवाले, गोंधळी, दांडपट्टेवाले, आरादि, घडशी आदी देवीच्या सेवेकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत आपली सेवा व कला सादर केली. वाद्यवृंद, लेझीम व बँड पथकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. श्रीयमाई श्रीनिवास विद्यालयाच्या लेझीम व झांज पथकाने प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली.
रथोत्सव मिरवणूक चावडी चौक, मारुती मंदिर, बालविकास मार्गे ऐतिहासिक पद्माळे तळ्याकडे नेण्यात आली. सायंकाळी उशिरा पद्माळे तळ्यात देवीस अभिषेक करून पंचोपचार पूजन करण्यात आले. सुमारे सहा तास चाललेल्या या भव्य रथोत्सव सोहळ्यास परिसरातील विविध गावांचे सरपंच, सोसायटी चेअरमन व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान औंध पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
दीपमाळ प्रज्वलनाचा ऐतिहासिक सोहळा
रथोत्सवाच्या पूर्वसंध्येला शाकंभरी पौर्णिमेनिमित्त श्रीयमाईदेवीचे पूजन करून पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ऐतिहासिक व धार्मिक परंपरेनुसार काळ्या पाषाणातील दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली. या दीपमाळ प्रज्वलनाचा सोहळा पाहण्यासाठी भाविक, ग्रामस्थ व महिलांनी मोठी गर्दी केली होती.

