दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव -नवनाथ यादव
धाराशिव | प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि (शिंदे गट) शिवसेना युतीबाबत मुंबईत जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत असून, या घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, युती व जागावाटपाबाबतची महत्त्वाची चर्चा थेट मुंबईत होत असून, या प्रक्रियेत स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याची भावना वाढताना दिसत आहे. यामुळेच जिल्ह्यातील अनेक नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत नसले, तरी अंतर्गत अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत आहे.नगर परिषद निवडणुकांच्या वेळी पाहायला मिळालेलं “लढताना विरोध, जिंकताना युती” हेच चित्र आता जिल्हा परिषद निवडणुकीतही पुन्हा उभं राहत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या भूमिका आणि निकालानंतर युतीचा दावा—या पद्धतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचेही बोलले जात आहे.
🔍*स्थानिक नेतृत्व डावलल्याची भावना*
मुंबईत सुरू असलेल्या चर्चांमध्ये जिल्हा पातळीवरील नेतृत्वाला पुरेसे महत्त्व न दिल्याने शिवसेना व भाजपच्या काही स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर अधिक तीव्र होत आहे. “जिल्ह्यात मेहनत करणारे कार्यकर्ते बाजूला, तर निर्णय मात्र मुंबईत”—अशी भावना अनेकांच्या मनात घर करून बसल्याचे सांगितले जात आहे.
⚡*राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता*
या नाराजीचे परिणाम आगामी निवडणुकीत उमटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही नेत्यांकडून स्वतंत्र भूमिका घेण्याचे संकेत, तर काहींकडून वरिष्ठांकडे नाराजी पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप–शिवसेना युतीची गणिते जरी मुंबईत जुळवली जात असली, तरी धाराशिव जिल्ह्यात ती सहज स्वीकारली जातील का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकंदरित, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील खलबते आणि जिल्ह्यातील असंतोष यामुळे धाराशिवचे राजकारण निर्णायक वळणावर आले आहे. येत्या काही दिवसांत युती, जागावाटप आणि संभाव्य नाराजी यावरून राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
