प्रतिनिधी सोमनाथ काळे
आळंदी -: गुन्हेगारी,व्यसनाधीनता, वाईट संगती , मोबाईल इ. कारणांमुळे आजचा विद्यार्थी भरकटत चाललेला आहे. त्याचे भविष्यात समाज व देशावर उमटणारे दुष्परिणाम याचा विचार करता विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण व संस्काराच्या माध्यमातून त्यांच्या बौद्धिक व वैचारिक क्षमतेचा विकास व्हावा, तसेच मराठी भाषेचे सौंदर्य रुजविण्याच्या दृष्टिकोनातून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या सहकार्याने व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या संकल्पनेतून श्री ज्ञानेश्वर विद्यालयांमध्ये इयत्ता ५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी हरिपाठ पाठांतर, इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी हरिपाठ अर्थ विवेचन व इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या संस्कारक्षम उपक्रमाची पाच वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती.
या उपक्रमाचा मुळे विद्यार्थ्यांमध्ये होणारे सकारात्मक बदल पाहून राज्यातील १५० हून अधिक शाळांनी हा उपक्रम स्वीकारला आहे.श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व पत्रकार संघ आळंदी देवाची यांचा मिळून एक परिवार तयार झाला आहे. या परिवाराच्या अंतर्गत सर्व सहभागी संस्था व शाळा, त्यांचे अध्यापक , महाराज मंडळी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण व संस्कार देण्याचे कार्य करीत आहेत.
ज्या शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे अशा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी “हरिपाठ पाठांतर व अर्थ विवेचन तसेच ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमामुळे माझ्या जीवनावर झालेला परिणाम” या विषयांवर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी श्री ज्ञानेश्वर विदयालय,आळंदी देवाची येथे संपन्न होणार आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. स्पर्धकांच्या वकृत्वाचे मूल्यमापन विषयाची समज, भाषेची शुद्धता, विचारांची मांडणी, प्रभावी सादरीकरण व वेळेचे नियोजन या निकषांवर करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, वैचारिक, सांस्कृतिक जडणघडणी बरोबरच एक आदर्श व्यक्तिमत्व घडण्याच्या दृष्टिकोनातून मोलाची ठरणार आहे असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
दि.२४/०१/२६ रोजी स. दहा वा.स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा आचार्य सागर महाराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त मारुती जगताप, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. चैतन्य महाराज लोंढे कबीर बुवा, .ऐड राजेंद्र उमाप,ऐड.रोहिणी पवार, वारकरी सेवा संघ पुणे चे अध्यक्ष विलासराव बालवडकर व ओळख श्री ज्ञानेश्वरीची परिवारातील सर्व घटक तसेच दि.२५/०१/२६ रोजी दु. अडीच वा.पारितोषिक वितरण स्पर्धा सांगता समारंभ व ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ पुस्तकाची द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ. प. योगी निरंजननाथ यांचे अध्यक्षते खाली व आमदार बाबाजी काळे , पोलीस उपायुक्त डॉ. रवींद्र शिसवे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. पुरुषोत्तम दादा पाटील,डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, व ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ परिवारातील सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने आळंदी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे वक्तृत्व ऐकण्यासाठी तसेच उद्घाटन व समारोप कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
