ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी ,विकी जाधव
(जिल्हा परिषद, ठाणे) – भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आज, दि. २६ जानेवारी, २०२६ रोजी साकेत पोलीस मैदान, ठाणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमाचे औपचारिक अनावरण करण्यात आले.
मिशन भरारी अंतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांना विमानवारीची संधी
मिशन भरारी उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषद शाळांतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विमानप्रवासाचा अनुभव देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा आहे.
या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवी या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांच्या केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धा परीक्षांमधून जिल्हास्तरावर निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी व मार्च २०२६ दरम्यान देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येणार असून, या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विमानवारी करण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन, अवकाश विज्ञान, आधुनिक प्रयोगशाळा व नव्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळणार असून, त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळणार आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे तसेच विविध मान्यवर, अधिकारी, शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांनी मिशन भरारी उपक्रमाचे कौतुक करत, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नवे क्षितिज मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

